दिखाऊपणा नको, नियोजनबद्धता आणा , मेट्रो-३ प्रकल्पाबाबत पर्यावरण तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:51 AM2018-02-26T01:51:24+5:302018-02-26T01:51:24+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या प्रकल्पामुळे मुंबईत विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. या कामी झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या प्रकल्पामुळे मुंबईत विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. या कामी झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात मुंबई थोडी तरी शिल्लक राहील का, की मुंबईत केवळ मेट्रो-३ उरेल, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला नुकतेच सुनावले. यावर मेट्रो-३ प्रकल्पामुळे मुंबईला कितपत धोका आहे, याविषयी ‘लोकमत’ने पर्यावरण व वाहतूक तज्ज्ञांची मते जाणून घेतली असून, बेसुमार झाडांंची कत्तल, प्रदूषित मिठीसह ध्वनी आणि वायुप्रदूषणाला तज्ज्ञांनी मेट्रोच्या कामाला जबाबदार धरले आहे. विशेषत: मेट्रो-३ कामात नियोजनबद्धता नसून, फक्त दिखाऊपणा असल्याची टीकाही पर्यावरण आणि वाहतूक तज्ज्ञांनी केली आहे.
पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो-३ प्रकल्प नियोजनबद्ध नाही. विकास आराखड्याचा भाग यात दिसून येत नाही. मेट्रो-३ प्रकल्पामध्ये ६७३ झाडे कापली जाणार होती. मात्र, आतापर्यंत ५ हजार झाडे तोडली गेली आहेत. औद्योगिक प्रकल्पामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रो-३ प्रकल्प हा ८० ते १०० फूट खोल आहे. त्यामुळे कोणती दुर्घटना झाली, तर अत्यावश्यक सुविधा कोणत्या पुरविल्या जाणार आहेत. मेट्रो कामामुळे रस्ते बंद केले आहेत, काही रस्ते हे अरुंद करण्यात आले आहेत. अनेक मैदानेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. मेट्रोचा प्रकल्प थांबविणे गरजेचे आहे. चुकीचे निर्णय आणि धोरणे, यामुळे शहराच्या मुळावर मेट्रो उठली आहे. मेट्रो ही काळाची गरज असली, तरी तिने नैसगिक आपत्ती स्वत:हून ओढावून घेतली आहे.
मुंबईच्या भूगर्भात यंत्र चालविल्यामुळे याचे परिणाम पृथ्वीला आणि संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत आहेत. मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा उत्तम पर्याय आहे. १९९६च्या अहवालानुसार बस ही ४ टक्के जागा व्यापत होती आणि ८१ टक्के नागरिकांना सुविधा देत होती, तर खासगी गाड्या, टॅक्सी या ८४ टक्के जागा व्यापत होत्या आणि ७ टक्के नागरिकांना सुविधा देत होत्या. आताच्या परिस्थितीत या संख्येतील तफावत वाढत गेलेली आहे. २० वर्षांत अनेक उड्डाणपुले बांधली, मोनोरेल सुरू केली, तरी वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे.
वाहतूक तज्ज्ञ रोहित कात्रे यांच्या म्हणण्यानुसार, ‘मेट्रो-३ प्रकल्प मुंबईसाठी अत्यावश्यक आहे. या आधीच तो यायला हवा होता. मेट्रोमुळे मुंबईकरांचे जीवन सुखदायक होईल. आता होणारा त्रास हा तात्पुरता असून मुंबईकर सहन करतील. मुंबईकर हे सहनशील आहेत. मेट्रो-३ च्या प्रकल्पाचे अनेक फायदे आहेत. पर्यावरणावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. इंधनाची बचत दिसून येईल. मेट्रो-३ प्रकल्प प्रगतीकडे नेणारा आहे. मेट्रो-३ ही होणे गरजेचे आहे. मेट्रो-३ मुळे होणारा त्रास हा तात्पुरता आहे.’
२०१५मध्ये चेन्नई शहरात आलेल्या पावसात भूमिगत मेट्रोत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर पायाभूत यंत्रणेचे नुकसान झाले आणि मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मिठी नदीच्या नावाने टाहो फोडणाºया राजकीय नेतृत्वानेच या नदीच्या संपूर्ण प्रवाहाखालूनच या मेट्रो मार्गाचे नियोजन करून या नदीचा ‘अंत्यसंस्कार’ केला आहे.
आजचे बहुतेक मुंबईकरच पर्यावरणाबाबत उदासीन असल्याने, आरे कॉलनीमधील झाडे तोडणे म्हणजे, ‘विकासासाठी केलेले बलिदान’ असे मिरविले जात आहे. या मुद्द्याचा वापर राजकारणासाठी केला जात आहे आणि मेट्रोचे जे प्रवासाचे दर ठरविले जाणार आहेत, ते सामान्यांना परवडणारे नाहीत.
मेट्रो ३ हा केवळ राजकीय अट्टाहास-
मुंबई शहराचे अभ्यासक सीताराम शेलार यांनी सांगितले, मेट्रो-३ हा प्रकल्प केवळ राजकीय अट्टाहास आहे. हा प्रकल्प ज्या परिसरातून जातो, तेथे उच्चभ्रू लोकांची वसाहत असून, येथील अतिश्रीमंत वर्ग आपल्या आलिशान गाड्या सोडून, मेट्रोच्या एसी लोकलमधून प्रवास करणार नाहीत. मुंबईच्या भूगर्भाची वास्तविकता बघता, अशा समुद्रकिनारी असणाºया शहरात भूमिगत मेट्रो म्हणजे गंभीर आपत्तीला आमंत्रण देण्यासारखे आहे.
पर्यावरण तज्ज्ञ डी. स्टॅलिन यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो-३ प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईपासून ते सीप्झपर्यंत प्रत्येक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मेट्रो-३च्या कामामुळे बेसुमार झाडांची कत्तल होत असून, त्याचा हिशोब केला गेला नाही. अंदाजे ५ हजार ते ६ हजार झाडे तोडण्यात आली आहेत. याचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. मात्र, पुनर्रोपणासाठी जागा राखीव नाही. खोदकामामुळे मोठ्या प्रमाणावर माती निर्माण होत असून, ही माती टाकणार कुठे, समुद्र व समुद्र किनारे भराव टाकून नष्ट करण्यात येत आहेत.
मेट्रोच्या कामामध्ये नियोजन नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. खोदकामातून निर्माण होणाºया आवाजाचा, धुळीचा परिणाम स्थानिक नागरिकांवर होत आहे. मैदाने संपविण्यात येत आहेत. मेट्रोमुळे प्रदूषण कमी होत नसून वाढत आहे. कारण दिल्ली, कोलकाता येथील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. खासगी गाड्यांची संख्या कमी होणार नाही. आरे कॉलनीमधील झाडांची कत्तल करणे चुकीचे असून, कारशेडला पर्याय कांजूर योग्य आहे.