Join us

दारे उघडताहेत म्हणून गाफील राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने नुकतेच शाळा, धार्मिक स्थळे सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने नुकतेच शाळा, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून मागील काही दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. खबरदारी म्हणून बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. अतिरिक्त खाटा आणि औषध साठ्यासह पालिका यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता, दक्ष राहायला हवे, तरच तिसरी लाट रोखणे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार जून महिन्यापासून नियंत्रणात येऊ लागला. त्यामुळे मुंबईतील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के एवढा आहे. तर गणेशोत्सवानंतरही दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या ३५० ते ४५० वर स्थिरावली आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे सुरू होणार आहेत.

अंधेरी, कांदिवली सक्रिय रुग्ण अधिक....

मागील महिन्यात अडीच हजारांवर आलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ हजार ६७६ एवढी आहे. भायखळा, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, चेंबूर या भागांमध्ये रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१० टक्के ते ०.०७ टक्के एवढी आहे. तर सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरी पश्चिम (४८३), कांदिवली (३५०), अंधेरी पूर्व (२९३) वांद्रे पश्चिम (२८९) एवढी आहे.

अशी घेणार खबरदारी....

मुंबईतील सर्व व्यवहार सुरू होत असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. यासाठी मंगळवारी विशेष लसीकरण मोहीमदेखील राबवण्यात येणार आहे. तसेच कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मागील काही महिन्यांत दररोज सरासरी २५ हजार ते ३० हजार चाचण्या होत होत्या. मात्र आता हे प्रमाण ३५ ते ४० हजार चाचण्या एवढे करण्यात आले आहे. ३० हजार खाटांची तयारी ठेवली आहे. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.