मुंबई : शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न नागरिकांना सतावत असताना, मुंबई महापालिका मात्र दादरसारख्या ठिकाणी सुस्थितीत असलेले पार्किंग रद्द करून तेथे अनावश्यक सुशोभीकरणाचा घाट घालत आहे. स्थानिकांसह विद्यार्थ्यांचा विरोध डावलून पालिका हे काम करीत आहे. परिणामी, या सुशोभीकरणाला स्थानिकांसह विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.दादर आणि माटुंगा येथील मध्यवर्ती ठिकाण म्हणून डॉ. गं. मा. फडके चौकाची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या चौकात स्थानिकांसह विद्यार्थी आपली वाहने उभी करीत आहेत. चौकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या चौकाचे सुशोभीकरण केल्यास वाहने उभी करता येणार नाहीत. परिणामी आम्ही आमची वाहने कुठे उभी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.परिसरात महाविद्यालये, शाळा तसेच नर्सिंग होम, रुग्णालये आहेत. त्यामुळे परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना ही विनामूल्य पार्किंग सोयीची ठरते. मात्र लोकप्रतिनिधींना हे पाहवत नसल्याने येथे सुशोभीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. हे काम थांबविले नाही, तर विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रुईया महाविद्यालयाचा विद्यार्थी अजित घाग याने दिला आहे.चौकाशेजारील इमारतीत राहणाऱ्या सुजाता बाडकर यांनी सांगितले, ‘पार्किंगमधूनच आम्हाला ये-जा करण्यासाठी रस्ता होता. या सुशोभीकरणामुळे तो रस्ताही बंद करण्यात आला आहे. पालिकेच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला नाहक त्रास सोसावा लागत आहे. रोडवर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? पालिका त्याची जबाबदारी घेणार का, असा खडा सवालही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
सुशोभीकरण नको, ‘पार्किंग’च हवे
By admin | Published: March 21, 2016 2:08 AM