मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील तिवरांचे जंगल दिवसागणिक कमी होत असून, तिवरांची तोड होत असल्याने पर्यावरणाला धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या तिवरांची झाडे तोडली जात असून, संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, मुंबईला पुराचा धोका वाढतच असून, तिवरांची होणारी तोड रोखण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.पश्चिम उपनगरात वांद्र्यापासून दहिसरपर्यंत ठिकठिकाणी खाडीचा प्रदेश आहे आणि या खाडी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर तिवरांची जंगले आहेत. मात्र, मागील काही वर्षांत येथील तिवरांच्या जंगलावर संकट आले आहे. भूखंड गिळंकृत करण्यासह झोपड्या बांधण्यासाठी तिवरांची कत्तल केली जात आहे. मागील काही वर्षांपासून गोराई येथील तिवरांची कत्तल करण्यात आली असून, सॅटेलाइट छायाचित्रांद्वारे २०१०, २०१४ आणि २०१७ मध्ये येथील तिवरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. मुळात तिवरांची जंगले ही पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत तिवरांची तोड होत असल्याने, पर्यावरणाला धोका दिवसागणिक वाढत आहे. विशेषत: गोराई, मालाड, चारकोप आणि कांदिवली या परिसरातील तिवरे नष्ट होत आहेत.तिवरांची जंगले वाचावित, येथे बांधकामे उभी राहू नयेत आणि पर्यावरणाला हातभार लागावा, म्हणून पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव सतिश गवई, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, कांदळवन विभागाचे प्रमुख आणि मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, सहायक वनसंरक्षक मकरंद घोडके आणि उपनगरचे जिल्हाधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्यासह संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परिणामी, संबंधितांनी तिवरांच्या कत्तलीची दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.दरम्यान, गोराईसह पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी होत असलेल्या तिवरांच्या कत्तलीकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा आवाज उठवण्यात आला आहे, परंतु प्रशासनाकडून काहीच हालचाल होत नाही. परिणामी, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवाद्यांकडून नाराजी व्यक्त होत असून, भविष्यातील धोका ओळखत तरी किमान कार्यवाही अपेक्षित असल्याचे अल्मेडा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. (प्रतिनिधी)
तिवरांची तोड सुरूच
By admin | Published: April 10, 2017 6:30 AM