आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नका - प्रवीण घुगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:57 AM2018-06-14T04:57:49+5:302018-06-14T04:57:49+5:30
बालकलाकारांचा उद्देश हा वैयक्तिक विकासावर असतो. या मुलांवर कोणत्याही प्रकारच्या अपेक्षांचे ओझे लादता कामा नये. दिवसेंदिवस बालकलाकारांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. बालकलाकार सहभागी होण्यापासून ते त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी होईपर्यंत जी वाटचाल असते, यावर बालहक्क संरक्षण आयोग या विषयावर गंंभीररीत्या विचार करत आहे
मुंबई - बालकलाकारांचा उद्देश हा वैयक्तिक विकासावर असतो. या मुलांवर कोणत्याही प्रकारच्या अपेक्षांचे ओझे लादता कामा नये. दिवसेंदिवस बालकलाकारांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. बालकलाकार सहभागी होण्यापासून ते त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी होईपर्यंत जी वाटचाल असते, यावर बालहक्क संरक्षण आयोग या विषयावर गंंभीररीत्या विचार करत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग प्रवीण घुगे यांनी केले.
चाइल्ड राइट अॅण्ड यू, यूएनआयसीईएफ आणि स्टेट कमिशन आॅफ प्रोटेक्शन आॅफ चाइल्ड राइट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोटेक्टिंग आवर चाइल्ड आर्टिस्ट’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चगेट येथे मंगळवारी चर्चासत्र पार पडले, या वेळी प्रवीण घुगे बोलत होते.
बाल मजुरी कायदा २०१७मध्ये लागू करण्यात आला, तसेच पूर्वीच्या कायद्यात बालकलाकार यांचा यात समावेश नव्हता; परंतु नव्या कायद्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. ५ ते १४ वर्षांपर्यंतचे जे बालकलाकार आहेत, तसेच चित्रपट, मालिका, रिअॅलिटी शो इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या बालकलाकारांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन काकटकर यांनी दिली.
याबाबत अभिनेत्री दिव्या दत्ता म्हणाल्या की, चित्रपटात अनेक बालकलाकारांसोबत काम केले आहे. एखाद्या बालकलाकाराला विचारले की तू ही भूमिका करशील का? तर त्यांचे पालकच पुढे येऊन सांगतात, ‘तो करेल’ म्हणजेच, पालक आपली स्वप्ने लहान मुलांवर लादत
असतात. मुलांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या आपण पूर्ण करणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणावर लक्ष
देणे आवश्यक आहे. बालकलाकार
हे वयापेक्षा लवकर मोठे
होतात.
अभिनेता व चित्रपट निर्माता अमोल गुप्ते म्हणाले की, लहानपणी लहान मुलांच्या मनावर पोहोचलेला आघात हा दीर्घकाळ टिकून राहतो, यात मुले पुढे तणावाखाली जातात. पूर्वी सात वर्षांपर्यंत हातात पेन्सिल येत नव्हती; परंतु आता जन्माला आल्यावर हातात यांत्रिक बटणे येतात, याला आपण भविष्य म्हणतो. मुलांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. बालकलाकारांना चित्रपटसृष्टीमध्ये १४ तास काम करावे लागते, या पद्धतीला आळा घातला पाहिजे.
बालकलाकारांचे नियम (बालकामगार दुरुस्ती नियम २०१७)
१) तासांची संख्या - दिवसातील पाच तासांपेक्षा जास्त काम असू नये, तसेच बालकलाकारांना सलग तीन तास काम करू न देणे.
२) चित्रपट निर्मात्यांनी जिल्हा दंडाधिकाºयांकडून सहा महिन्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
३) केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चित्रपट निर्मात्यांनी शिक्षण, सुरक्षा आणि बाल अत्याचाराच्या अहवालांचे पालन करणे आवश्यक आहे.
४) एक जबाबदार व्यक्ती नियुक्त करणे आवश्यक आहे.
५) २७ दिवसांपेक्षा जास्त काळ सलगपणे काम करण्यास कोणत्याही मुलाला परवानगी
नाही.