रेल्वे रुळालगत होळी उभी करून तिचे दहन करू नका, रेल्वे प्रशासनाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:21 AM2020-03-07T00:21:38+5:302020-03-07T00:21:44+5:30
लोकलमधील प्रवाशांना इजा, अपघात होऊन सणाला गालबोट लागते. असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे.
मुंबई : होळी आणि धूलिवंदन आली की, धावत्या लोकलवर पाण्याने, रंगाने भरलेले फुगे, पिशव्या फेकणे असे प्रकार सुरू होतात. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांना इजा, अपघात होऊन सणाला गालबोट लागते. असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. जनजागृती कार्यक्रम करणे, रेल्वे रुळाशेजारी झोपडपट्टी असलेल्या भागात सुरक्षा वाढविणे, रेल्वे रुळालगत होळी उभारणे टाळणे, अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील माहिम, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, विरार; मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, सायन, घाटकोपर, ठाणे आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द, वडाळा या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने फौजफाटा वाढविण्यात येणार आहे. धावत्या लोकलवर फुगे मारताना कोणी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य, पश्चिम आाणि हार्बर मार्गावरील रेल्वे रुळांलगत बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे. यासह सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडीओ शूटिंगद्वारे टेहेळणी करण्याची उपाययोजना केली आहे. रेल्वे रुळाशेजारी असलेल्या सोसायटी आणि झोपडपट्टी परिसरात जाऊन समुपदेश आणि लघुपटाद्वारे जनजागृती कार्यक्रम केले जाणार आहेत. फुगे फेकून सणाचा बेरंग करणाºया समाजकंटकांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.
>धावत्या लोकलवर फुगे मारण्याच्या घटना जिथे झाल्या आहेत तेथे जादा सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टी वस्त्यांमध्ये जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. रेल्वे रुळांलगत होळी उभी करून तिचे दहन करू नका.
- अश्रफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे
>पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रत्येक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. होळी आणि धूलिवंदनानिमित्त कोणीही धावत्या लोकलवर रंगाने भरलेले फुगे मारू नका, सुरक्षा ताफा वाढविण्यात येणार आहे. यासह नागरिकांनीही सतर्क राहून फुगे मारण्याच्या घटना टाळाव्यात.
- विनीत खरब, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे