- महेश चेमटे मुंबई : शहरातील रेल्वे वाहतूक व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी, मुंबई अर्बन ट्रॉन्सपोर्ट प्रोजेक्ट-३ अंतर्गत ४७ वातानुकूलित लोकल (१२ डब्ब्यांच्या) शहरात दाखल होणार आहेत. यासाठी तब्बल ३ हजार ४९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे या लोकल भाडेतत्त्वावर घेणे फायदेशीर ठरेल का? यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) चाचपणी करत आहे.रेल्वेच्या एका करारानुसार ही प्रक्रिया पार पडणे शक्य आहे. भाडेतत्त्वावर रेल्वे इंजिन घेण्याची पद्धत फायदेशीर आहे. भारतीय रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून (आयआरएफसी) भाडेतत्त्वावर लोकल घेता येणे शक्य आहे. साधारण १५ वर्षांसाठी लोकलसाठी करार केला जातो.प्रत्यक्षात लोकल सेवेत दाखल केल्यानंतर, भाडेकरारापोटी ठरावीक रक्कम अदा करण्यास सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक न झाल्याने, अन्य विकासाची कामे करण्यासाठीदेखील निधी उपलब्ध असतो. यामुळे अन्य विकासकामे करण्यासाठीदेखील पर्याय खुले राहतात.१० हजार ९५० कोटींची तरतूदएमयूटीपी-३ प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील सुलभ रेल्वे वाहतुकीसाठी, १० हजार ९५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार ४९१ कोटी उपनगरीय लोकलसाठी खर्च करण्यात येणार आहे. एमयूटीपी- १ आणि एमयूटीपी-२ अंतर्गत चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधून सिमेन्स आणि बंबार्डिअर लोकल खरेदी करण्यात आल्या आहेत.एमयूटीपी-३ अंतर्गत येणारे ५६५ ईएमयू डबे भाडेतत्त्वावर घेणे फायदेशीर ठरू शकेल का? यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. यामुळे मोठी गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. लोकल विकत घेतल्यास कर्ज मंजूर झाल्यानंतर, तत्काळ कर्ज परतावा प्रक्रिया सुरू होते, पण ती भाडेतत्त्वावर घेतल्यास प्रत्यक्ष सेवेत दाखल केल्यानंतर त्याची परतावा प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे परतावा करण्यासाठीची प्रक्रियादेखील सुलभ होते. परिणामी, यासंबंधी अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.- प्रभात सहाय, व्यवस्थापकीय संचालक,मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड
लोकल विकत नको, भाडेतत्त्वावर हवी! एमआरव्हीसीची लोकलसाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 4:52 AM