मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 01:21 PM2020-01-27T13:21:24+5:302020-01-27T13:29:34+5:30
तब्येत बरी नसल्याने राज ठाकरे बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात आलं. या पुढील बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.
मुंबई - पाकिस्तान अन् बांग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढा या मागणीसाठी मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे हजर होते. मात्र अवघ्या १० मिनिटांत ते बैठकीतून बाहेर पडले. मात्र यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या बैठकीला राज ठाकरे म्हणाले की, मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा आहे. मी बाळासाहेबांइतका मोठा नाही. त्याचसोबत शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्यांचे कुठल्याही प्रकारचा अनादर होणार नाहीयाची दक्षता घ्या, रेल्वे इंजिन असलेला झेंड्याचा वापर करावा. ज्या प्रभागात राजमुद्रा असलेला झेंडा लावण्यात येईल तेथील विभाग अध्यक्षाची ही जबाबदारी असेल. झेंड्यांचा अपमान होता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी तयारीला लागा, मोठ्या संख्येने यावं अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक होती. तब्येत बरी नसल्याने राज ठाकरे बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात आलं. या पुढील बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.
मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालून केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका घेतल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर बॅनरवर तसेच सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत होता. यावरुन शिवसेनेही मनसेवर टीका केली होती. नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही आणि हिंदूंची मत देखील मिळत नाही असा टोला शिवसेनेनं मनसेला लगावला होता.