सीईटी सेलचे महाआयटी कंपनीला निर्देश : कृषी प्रवेशावेळी येेणाऱ्या अडचणींची घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाआयटी कंपनीची प्रवेशप्रक्रिया राबविणारी यंत्रणा कोलमडल्यामुळे आणि महाआयटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवेशप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांचा प्रचंड मनस्ताप झाला आहे. याची दखल घेत सीईटी सेल आयुक्तांनी महाआयटी कंपनीला कृषी विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशात सतत येणाऱ्या अडचणींसंदर्भात नोटीस दिली आहे. यात आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चारही कृषी विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये व महाआयटी कंपनीला महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी अपलोड केल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका, असे निर्देश सीईटी सेलने महाआयटी कंपनीला दिले.
कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेशाची जबाबदारी महाआयटीकडे आहे. मात्र सतत येणाऱ्या अडचणींमुळे ही जबाबदारी पार पाडण्यास महाआयटी प्रशासन असमर्थ असल्याच्या तक्रारी पालक, विद्यार्थी करत आहेत. याची दखल घेऊन सीईटी आयुक्त चिंतामणी जोशी यांनी काही सूचना जारी केल्या आहेत. प्रवेश वाटप पत्रावर नमूद केलेल्या महितीनुसार (प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ता इत्यादी) उमेदवाराने कागदपत्रे अपलोड केलेली नसल्यास मात्र प्रवेश देतेवेळी उमेदवाराकडे आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्याला प्रवेश द्यावा, अशा सूचना सीईटी सेलने राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारी महाविद्यालये व त्यांची प्रवेशप्रक्रिया राबविणाऱ्या महाआयटीला दिल्या आहेत. केवळ कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा चुकीच्या ठिकाणी अपलोड केली आहेत या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नयेत असे सेलचे आयुक्त जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
* ‘शहानिशा करून सुधारणा करा’
तात्पुरत्या गुणवत्ता यादीत नमूद केलेला प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबा इत्यादी संदर्भात उमेदवाराने कोणतीही हरकत घेतली नसताना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये या बाबींमध्ये बदल असल्यास व उमेदवाराकडून हरकत उपस्थित केल्यास त्याबाबतची शहानिशा करून छाननी अधिकाऱ्याच्या समन्वयाने महाआयटीने सुधारणा कराव्यात आणि पुढील प्रवेशफेरी राबवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सीईटी सेलच्या सूचनांमुळे तरी कृषी पदवी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील सतत येणाऱ्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक करत आहेत.
......................