माफ केलेल्या शेतीकर्जावर व्याज आकारू नका !, सर्व बँकांच्या अधिका-यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:19 AM2018-02-09T06:19:33+5:302018-02-09T06:20:25+5:30
सरकारने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्जखात्यांवर बँकांनी ३१ जुलै २०१७ नंतर व्याज आकारणी करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सर्व बँकांना दिले.
मुंबई : सरकारने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्जखात्यांवर बँकांनी ३१ जुलै २०१७ नंतर व्याज आकारणी करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सर्व बँकांना दिले. कर्जमाफी योजनेच्या जिल्हानिहाय आणि बँकनिहाय आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यापूर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर व्याज न आकारण्याचा निर्णय झाला होता. तरीही काही बँका कर्ज खात्यांवर जुलै २०१७ नंतर व्याज आकारत असल्याचे आढळून आले आहे. बँकांनी अशा प्रकारे व्याज आकारणी करू नये; अन्यथा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला.
एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकांनी विशेष मोहीम राबवून शेतकºयांना थकबाकीची उर्वरित रक्कम भरण्यास प्रोत्साहित करावे, जेणेकरून त्यांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देता येईल, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
12300 कोटी रुपये संबंधित कर्ज खात्यांत वर्ग कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील एकूण ३१.३२ लाख कर्ज खात्यांवर १२,३०० कोटी इतकी रक्कम संबंधित कर्ज खात्यांत वर्ग करण्यात आली आहे.
२१.६५ लाख खात्यांपैकी १३.३५ लाख खात्यांची माहिती बँकांनी अपलोड केली आहे. उर्वरित कर्जखात्यांची माहिती पुढील तीन दिवसांत सर्व जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका, व्यावसायिक बँकांनी पोर्टलवर टाकावी.
उर्वरित टप्प्यातील रक्कम पात्र खातेदारांच्या कर्जखात्यावर जमा होण्यासाठी बँक व तालुकास्तरीय समित्यांनी जलदगतीने व अचूक काम करण्याचे निर्देश या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.