भाजपाला जवळ करू नका, मुंबईच्या डबेवाल्यांचा शिवसेनेला सल्ला
By admin | Published: February 25, 2017 07:10 AM2017-02-25T07:10:56+5:302017-02-25T07:10:56+5:30
शिवसेनेला गरज पडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घ्यावी, पण चुकूनही भाजपची मदत घेऊ नये. तसेच यापुढे भाजपला मदतही करू नये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 : शिवसेनेला गरज पडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घ्यावी, पण चुकूनही भाजपची मदत घेऊ नये. तसेच यापुढे भाजपला मदतही करू नये, असा सल्ला मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेला दिला आहे. भाजपला सोबत घेतल्यास ते शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.
तळेकर म्हणाले की, डबेवाल्यांनी पहिल्यापासूनच शिवसेनेला साथ दिली आहे. या महापालिका निवडणुकीतही डबेवाल्यांनी शिवसेनेचा प्रचार केला. सेनेने उल्लेखनीय यश मिळाल्यावर पेढे वाटून आनंदही साजरा केला. आता मात्र सेनेने कुणाचीही मदत घेऊन महापौर बसवावा, पण भाजपला संधी देऊ नये, असे भावनिक आवाहनही तळेकर यांनी केले आहे.
एकंदरीतच मुंबईतील डबेवाला हा भाजपविरोधात बंड करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्याच सत्ता स्थानामुळे ते शिवसेनेला पाणी पाजाण्याच्या गोष्टी करत आहेत. या सरकारचा पाठिंबा काढून टाकला पाहिजे, नाहीतर हा भस्मासुर सत्तेच्या बळावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना संपवतो आहे. हा भस्मासुर शिवसेनेच्या डोक्यावरही हात ठेवील, असा इशारा तळेकर यांनी दिला आहे.