मुंबई : गो-एअर व इंडिगो यांच्या विमानांच्या इंजिनात दोष आढळल्याने ती सेवेतून मागे घ्यावीत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करू नका, असे नागरी विमान उड्डाण महासंचालनालया (डीजीसीए) ला व दोन्ही विमान कंपन्यांना सांगितले.गो-एअर व इंडिगो या एअरलाइन्स यू.एस.च्या ‘प्रॅट अँड व्हिटने (पीडब्ल्यू) इंजीन’चा वापर ए ३२० निओ विमानांसाठी करतात. मात्र, या कंपनीच्या ‘पीडब्ल्यू ११००’ इंजीनमध्ये दोष असल्याचे यू.एस. सरकार व डीजीसीएने मान्य केले आहे. त्यामुळे ही इंजीन बसविलेली सर्व विमानांची सेवा मागे घेण्याचे निर्देश द्या, अशी याचिका मुंबईतील हरीश अग्रवाल यांनी दाखल केली. यावरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर होती. सुनावणीत गो-एअर व इंडिगोने संबंधित विमानांची सेवा मागे घेतल्याचे सांगितले. डीजीसीएचे वकील अद्वैत सेठना यांनीही स्वतंत्र अभ्यास केला असून ४५० व त्यापुढील सीरिजची इंजीन असलेल्या विमानांची सेवा रद्द करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.>आवश्यक काळजी घ्या : न्यायालयाने या विमानांची सेवा रद्द केल्याने अन्य एअरलाइन्स कंपन्यांवर ताण पडणार, असे या वेळी म्हटले. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी डीजीसीएने घ्यावी, या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्या. तसेच ४५० च्या सीरिजच्या आधीच्या इंजीनचीही चाचणी करा. प्रवाशांची खात्री करून द्या, की ही इंजीन सुरक्षित आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांपर्यंत तहकूब केली.
प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करू नका : उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:39 AM