मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईत शेकडो वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला असलेले कोळी बांधव हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात 189 गावठाणे आणि 41 कोळीवाडे आहेत. उपनगरातील 15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करू उपनगरातून वगळलेल्या 15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करून त्या कोळीवाड्यांचे पुन्हा सर्वेक्षण करा अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी रात्री तातडीने पत्र दिले आहे.
एसआरए योजनेच्या माध्यमातून येणारे संभाव्य संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवांनी तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेने सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असेही प्रभू यांनी या पत्रात नमूद केले आहे.शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी 11 फेब्रुवारी रोजी पालिका सभागृहात 66 ब अन्वये प्रस्ताव पटलावर आणून या प्रश्नाला वाचा फोडली. लोकमतच्या वृत्ताची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जातीने दखल घेतली. नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणली.
याप्रकरणी पालिका आयुक्तांना जाब विचारा, मुख्यमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून उपनगरातील 15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करून पुन्हा सर्वेक्षण करा अशा सूचना त्यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार व माजी महापौर सुनील प्रभू व शीतल म्हात्रे यांना दिल्या.
मुंबई उपनगरात 29 कोळीवाडे असल्याचे केंद्रीय फिशरीज इन्स्टिटय़ूटच्या मदतीने तयार केलेल्या अहवालात नमूद आहे. मात्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीने उपनगरात केवळ 14 कोळीवाडे असल्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे वगळलेल्या उर्वरित 15 कोळीवाड्यांचा भविष्यात ‘एसआरए’ योजनेत समावेश झाल्यास त्याचा मोठा फटका येथील कोळी बांधवांना बसणार आहे. विकास नियंत्रण नियमावलीत कोळीवाडय़ांसाठी केलेल्या स्वतंत्र तरतुदींमधील लाभांपासून कोळी बांधवांना वंचित राहावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे या कोळीवाड्यांचा एसआरए योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा आणि त्यांचे पुनर्सर्वेक्षण करावे असे प्रभू यांनी या पत्रात नमूद केले आहे.
या संदर्भात काल लोकमत ऑनलाईन व आजच्या लोकमतमध्ये सदर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचे जोरदार पडसाद कोळीवाड्यांमध्ये उमटले. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने गंभीर दखल घेतल्याबद्धल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तर वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी 15 कोळीवाडे वसगळ आम्ही 50 हुन अधिक बैठका कोळीवाडे व गावठणात घेतल्या. आयुक्तांची सुद्धा भेट घेतली असता त्यानी दाद दिली नाही. आता उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घातल्याने निश्चित कोळी समाजाला न्याय मिळेल असा विश्वास पिमेंटा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.