औरंगाबाद येथील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे कापू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 09:19 AM2019-12-10T09:19:17+5:302019-12-10T09:20:02+5:30
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरुन अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला ढोंगी असं म्हटलं होतं.
मुंबई - औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारक बनविण्याच्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. या स्मारकासाठी ५ हजार झाडे कापण्याचा विरोध होत होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही झाडे कापू नका अशाप्रकारचे आदेश दिले आहेत.
औरंगबाद महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य किशोर पाठक यांनी सांगितले होते की, जर हे उद्यान स्मारकासाठी द्यायचं झालं तर याठिकाणी ७ हजार ५०० झाडे आहेत. झाडे कापण्याचा विरोध समितीत होत आहे. प्रियदर्शनी पार्कमध्ये स्मारक बनविण्याचे प्रस्तावित आहे. याठिकाणी अनेक वन्य जीव, पक्ष्यांचे घर आहे असं त्यांनी सांगितले.
याबाबतीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, रविवारी उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणत्याही झाडाला हात लावू नका अशी सूचना केली आहे. आम्ही झाडे वाचवित स्मारक बनविणार आहोत. मात्र काही जणांकडून झाडे कापण्यात येणार आहेत अशा अफवा पसरविल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, झाडे कापण्याच्या वृत्तावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनीही विरोधक म्हणून आपली भूमिका निभावली होती. अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे, ठाकरे सरकार येताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यावरुनच, अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारला होता.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरुन अमृता यांनी शिवसेनेला ढोंगी असं म्हटलं होतं. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
तर अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला शिवसेनेनंही जशास तसं उत्तर दिलं होतं. औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड कापलं जाणार नाही, असं प्रियंका चर्तुवेदी यांनी सांगितलंय. त्यासाठी, औरंगाबाद महापालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या व्हिडिओचा संदर्भही त्यांनी दिला होता. माझ्या उत्तराने तुमची निराशा होईल, पण रेटून खोटं बोलणं हेही रोगाचं लक्षण आहे. झाडांची कपात करणारे कमिशन मिळणं ही भाजपाची नवीन पॉलिसी आहे. आशा आहे, आपण लवकर बऱ्या व्हाल... असे म्हणत अमृता यांना जशास तसं उत्तर शिवसेनेकडून देण्यात आलं.