मुंबई : रंगांचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, होळीसाठी झाडे तोडू नका आणि रंगपंचमी खेळण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर करू नका; तर पर्यावरणपूरक रंगांचा वापर करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी संस्थांनी केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते. होळी आणि रंगपंचमी साजरी कराच; मात्र उत्सवादरम्यान पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. विशेषत: पाण्याची नासाडी होणार नाही आणि रंगपंचमी खेळताना कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्या, असेही आवाहन करण्यात येत आहे. धुळवड साजरी करण्यासाठी बाजारपेठांत अनेक प्रकारचे रंग दाखल झाले आहेत. स्पॅरोज शेल्टर संस्थेच्या म्हणण्यानुसार, इकोफ्रेंडली होळी खेळण्याचा संकल्प मुंबईकरांनी करावा. होळीसाठी झाडे तोडली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. पालापाचोळा, काटक्या आणि कचरा यांची होळी करावी. नैसर्गिक रंगांची उधळण करावी. कृत्रिम रंग वापरू नयेत. कारण कृत्रिम रंग आरोग्याला हानिकारक असतात शिवाय ते पर्यावरणालाही हानिकारक असतात. पानांपासून, फुलांपासून बनविलेले रंग वापरावेत. रसायनमिश्रित रंगांऐवजी हळद, झेंडूची फुले, पळसाची फुले, बेसन, मेहंदी, कडूलिंबाचा पाला, कांद्याची साल, बीटपासून घरच्याघरी नैसर्गिक रंग तयार करावेत, असे आवाहन स्पॅरोज शेल्टरने केले आहे.
होळीसाठी झाडे तोडू नका, रासायनिक रंग वापरू नका, पर्यावरणप्रेमींनी केले मुंबईकरांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:18 AM