मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील मेट्रो कारशेडसाठी २ हजार २३८ झाडे तोडली जाणार आहेत. वृक्षतोडीविरोधात मुंबईकरांनी आवाज उठविला असून अद्यापही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरेच्या वृक्षतोडीसंदर्भात रॉबिनहूड अकादमीच्या लहान मुलांनी आरेतील झाडे तोडू नका, या विषयावर पत्रे लिहिली असून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविली जाणार आहेत.
रॉबिनहूड अकादमीचे दिनेश धवन यांनी सांगितले, ‘रॉबिनहुड आर्मी’ या संस्थेमार्फत तीन वर्षांपूर्वी ‘रॉबिनहुड अकादमी’ सुरू केली. देशभरात १०० शहरांमध्ये रॉबिनहुड अकादमी मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहे.
अकादमीच्या वतीने नरिमन पॉइंट येथील ७५ मुलांना शिकवतो आणि अन्न देतो. चालू घडामोडींवर मुलांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. आरेमध्ये वृक्षतोडीचा जो मुद्दा सुरू आहे त्याबद्दल पहिल्यांदा मुलांना माहिती देण्यात आली. मग मुलांना एक कार्ड देऊन त्यावर आपापली मते लिहिण्यास सांगितले. आतापर्यंत ४० ते ५० मुलांनी पत्र लिहिले आहे. आरेतील झाडे तोडली तर त्याचा परिणाम पर्यावरण आणि मानवावर काय होईल, हे मुलांनी पत्राच्या माध्यमातून सांगितले आहे. सर्व पत्रके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली जाणार आहेत.