Join us

उद्यानांच्या विकास निधीत कपात करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:06 AM

उद्यानांच्या विकास निधीत कपात करू नकाभारतीय जनता पक्षाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उद्यान विकासासाठी ...

उद्यानांच्या विकास निधीत कपात करू नका

भारतीय जनता पक्षाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीत पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी झालेल्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 72 चे नगरसेवक पंकज यादव यांनी हरकतीचा मुद्दा मांडत उद्यान विकासासाठी असणारा निधी पूर्ववत करावा. उद्यान निधी कपात मागे घेतली जात नाही तोपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवावा, अशी मागणी केली.

गेली आठ महिने शहरातील उद्याने बंद असून, त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. वृद्ध व बालके यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक उद्यानांतील पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. झाडांची अवस्था बिकट झाली आहे. प्रसाधनगृहांची मोडतोड झाली आहे. उद्यानांमधील खेळणी, साहित्य नादुरुस्त झाले आहे. अशा परिस्थितीत उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीत कपात करणे संयुक्तिक ठरणार नाही. कोविड परिस्थितीत हळूहळू जनजीवन पूर्ववत होत आहे. सर्वसामान्य नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. कोविडला सक्षमपणे सामोरे जाताना स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनची गरज भासते. या अनुषंगाने शहरातील बगीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे उद्यान विकास निधीत कपात करण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीमध्ये कपात करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या हरकतीच्या मुद्याला नगरसेवक सूर्यकांत गवळी, सुशांत सावंत, हरीश छेडा, शिवकुमार झा, नगरसेविका रजनी केणी, स्वप्ना म्हात्रे, रेणू हंसराज, तेजल देसाई, वैशाली पाटील यांनी पाठिंबा दर्शविला.

-----------------------------