लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुघलांनी ज्याप्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम केले तसे काम तुम्ही काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात करू नका, मराठा आरक्षणाचा बाऊ करून समाजात फूट पाडण्याचे काम करू नका, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात पार पडलेल्या सभेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
२०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र उद्धव ठाकरे सरकारने न्यायालयात पाठपुरावा न केल्याने ते टिकले नाही. जरांगे यांचा आदर आहे. समाजासाठी आपण काम करत असल्याचेही मान्य आहे. पण ज्या पद्धतीने तुम्हाला चालविले जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मुघलांप्रमाणे समाजात फूट पाडू नका, आम्हा मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, अशा शब्दात लाड यांनी जरांगे यांना सुनावले आहे.
हे विसरू नका... ज्या पद्धतीने तुम्ही फडणवीस यांच्यावर टीका करता, हे न शोभणारे आहे. तुम्ही इतिहास पाहिला तर शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री राहिले. विलासराव देशमुख ९ वर्षे मुख्यमंत्री राहिले. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाबासाहेब भोसले हेदेखील मुख्यमंत्री राहिले. या लोकांनी एवढे वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवले. पण ५० वर्षांच्या इतिहासानंतर एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले हेदेखील विसरून चालणार नाही, असेही प्रसाद लाड म्हणाले.