उगीच ‘ध’चा ‘मा’ करू नका - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:55 AM2017-08-17T05:55:33+5:302017-08-17T05:55:37+5:30
‘‘काही जण दलबदलू असतात, ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत,’’ हे विधान मी नारायण राणे यांच्याबद्दल नव्हे, तर नांदेडमधील नगरसेवकांबद्दल केले, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
मुंबई : ‘‘काही जण दलबदलू असतात, ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत,’’ हे विधान मी नारायण राणे यांच्याबद्दल नव्हे, तर नांदेडमधील नगरसेवकांबद्दल केले, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. प्रसारमाध्यमांनी ‘ध’चा ‘मा’ करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
नांदेडमधील काही नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपात गेले. यासंदर्भात मी प्रतिक्रिया दिलेली असताना काही माध्यमांनी आपण राणे यांना टोला मारल्याचे वृत्त दिले आहे. राणे अजून काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. नांदेडमधील नगरसेवक आता निवडणुका जवळ आल्यामुळे पक्ष सोडून गेले आहेत. भाजपा सध्या देशातील मोठा खरेदी विक्री संघ बनला आहे. कोण कामाचा आहे की नाही हे न पाहता प्रवेश देणे सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोक जातात-येतात, असे खा. चव्हाण यांनी सांगितले.
मराठा आरक्षण ते बैलगाडा शर्यत याबाबत राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडत आहे. तामिळनाडूमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळू शकते, तर महाराष्ट्रात बैलगाडाला का नाही, असा सवालही चव्हाण यांनी केला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची पात्रता होती का? देशमुख हे संघाशी निगडित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीशी संबंधित होते. आज विद्यार्थ्यांचे भविष्य वेठीस धरले जात आहे. परदेशात प्रवेश घ्यायचे आहेत. ते निकालामुळे रखडले आहेत. अशावेळी राज्यपालांनी तातडीने नवीन कुलगुरू नेमावेत, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.