मुंबई - कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी घणाघाती टीका केली. देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांना लगाला. सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला. पुरावे मागितले. देशविरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी उभे राहिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी भाजपा आणि मित्रपक्षांना साथ द्यायची की परिवारवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना साथ द्यायची, याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने करावा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे कलम ३७० च्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमित शहा यांनी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ''कलम ३७० हटवण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी कलम ३७० हटवण्यास त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमवले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी कौतुक केले होते. १९९४ मध्ये काश्मीरबाबत काँग्रेस सरकारने आणलेल्या प्रस्तावाला भाजपाने पाठिंबा दिला होता. तसेच अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असतानाही संयुक्त राष्ट्रांत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यामुळे देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका.'' ॉअमित शहा म्हणाले, ''कलम ३७० हा भाजपासाठी राजकीय मुद्दा आहे, असे राहुल गांधी म्हणतात. पण काश्मीर आणि कलम ३७० हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. कलम ३७० हटवण्यासाठी आमच्या तीन पिढ्या खपल्या आहेत. अनेकांनी बलिदान दिले आहे. अखंड भारत हेच आमचे लक्ष्य आहे.''
देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नका, काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहा बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:13 PM