लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमुन्यांमध्ये आढळून आलेले ई-कोलाय जीवाणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी-सरबत व उसाचा, फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी-भेळपुरीसारखे पदार्थ खाणेही टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या-फळे स्वच्छ धुऊन खावीत आणि वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखावी, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना पालिकेने केली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अन्नपदार्थ/पेयपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील बर्फ, पेय, अन्न, फळे, भाज्या इत्यादी निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने हे पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत, तसेच अतिसाराचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलेल्या ७ विभागांसह सर्वच विभागांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीने गृहभेटी, आरोग्य संवाद, ओआरएस पाकिटांचे व क्लोरिन गोळ्यांचे वितरण ही कार्यवाही करण्यात येत आहे.
‘उघड्यावरील पदार्थ खाऊ नका’
By admin | Published: May 13, 2017 1:35 AM