'प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात घालू नका'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:53 AM2019-09-22T04:53:49+5:302019-09-22T04:54:29+5:30
आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड आणि इतर प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात येणार आहे, असे भाष्य वन्यजीव शास्त्रज्ञ आनंद पेंढारकर यांनी केले
- सागर नेवरेकर
आरे कॉलनी ही जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत आहे. पशु-पक्षी, कीटक, झाडे-झुडपांच्या एक हजाराहून अधिक प्रजाती आढळतात. परंतु आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड आणि इतर प्रकल्प आणून प्राण्यांचा अधिवास धोक्यात येणार आहे, असे भाष्य वन्यजीव शास्त्रज्ञ आनंद पेंढारकर यांनी केले...
प्रश्न : आरे कॉलनीमध्ये तुम्ही संशोधन आणि अभ्यास केलेल्या पशू-पक्षी, कीटक व झाडांच्या किती प्रजाती आहेत?
उत्तर : आरे कॉलनीमध्ये सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, उभयचर प्राणी १३, फुलपाखरांच्या ८५, पतंग १५, टाचणी व चतुर ४०, कीटक १७०, मुंगी २२, कोळी ९०, इतर अष्टपदी प्राणी २०, अपृष्ठवंशी प्राणी ३५, झाडे व माड ८०, छोटी झाडे व झुडपे ३००, शेवाळ आणि इतर ४० प्रजाती अशा प्रकारे किमान १ हजार १४७ प्रजाती आरे कॉलनीमध्ये आढळून आल्या आहेत. यामध्ये आमचा अभ्यास व संशोधन तसेच वन्यजीव शास्त्रज्ञ, वन्यजीव संशोधक, काही प्राणिमित्र संस्था आणि विद्यार्थी यांनी केलेल्या संशोधनात्मक अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
प्रश्न : मुंबईकरांसाठी विकास महत्त्वाचा की पर्यावरण?
उत्तर : पर्यावरणाचा ºहास करून आपण जो विकास साधतोय, हे समीकरण कुठे तरी चुकतेय. त्याचा प्रचंड त्रास मुंबईकरांना भोगावा लागणार आहे. विदेशामध्ये एका माणसाच्या मागे ३०० हून अधिक झाडे असतात. मुंबईमध्ये काही भागांमध्ये एका माणसाच्या मागे
अंदाजे २७ झाडे तर मुलुंड, भांडुप, बोरीवली, कांदिवली, मालाड या हिरवळ भागात एका मनुष्याच्या मागे ५५ झाडे असा अंदाजे आकडा आहे.
तुमच्या मते मेट्रो कारशेडच्या पर्यायी जागा कोणत्या?
कफ परेड, सीएसएमटीजवळील पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ, धारावी, बीकेसी, कलीना मुंबई विद्यापीठ, कांजूरमार्ग इत्यादी जागा मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून सुचविल्या गेल्या होत्या.
आरेमध्ये कारशेड बांधले, तर त्याचा परिणाम वन्यजीवांवर कसा होईल?
उत्तर : प्रकल्पामध्ये येणारी झाडे ही दुसरीकडे नेऊन लावू शकता. परंतु झाडांवर जगणारे जे पशु-पक्षी आहेत त्यांचा अधिवास धोक्यात येईल. यार्ड ही रेड कॅटॅगरीमधली इंडस्ट्री आहे. तिच्यामुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होणार आहे. कचरा आणि गाळ हा संपूर्ण मिठी नदीमध्ये सोडला जाणार. त्यामुळे मिठी नदी आणखी प्रदूषित होईल. तसेच मेट्रो कारशेडनंतर हळूहळू इतरही प्रकल्प आरेमध्ये येऊन संपूर्ण हिरवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
प्रश्न : आरे जंगल नाही असे म्हटले जाते, यावर तुमचे मत काय ?
उत्तर : आरे कॉलनीमध्ये वन्यजीव आढळून येतात, मग आरे हे जंगल नाही का? आरेमध्ये झाडांच्या ८० प्रजाती या जंगली आहेत. मोठमोठ्या वेली या आरेमध्ये पाहायला मिळतात. औषधी व दुर्मीळ प्रकारची झुपडेही आढळतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर अभ्यास केला गेला, तर स्पष्ट दिसून येईल की आरे हे एक जंगल आहे. परंतु, कागदावर लिहून आरेची ओळख बदलली जात आहे. आता मुंबईकर आरेला तिची खरी ओळख मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत.