आरोपपत्र दाखल करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 02:22 AM2016-01-14T02:22:14+5:302016-01-14T02:22:14+5:30
एआयबी रोस्ट या कार्यक्रमात अश्लील भाषा वापरल्याबद्दल दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोन, अभिनेता रणवीर सिंह आणि अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करू नका
मुंबई : एआयबी रोस्ट या कार्यक्रमात अश्लील भाषा वापरल्याबद्दल दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोन, अभिनेता रणवीर सिंह आणि अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करू नका, असा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
करण जोहर, दीपिका पदुकोन व रणवीर सिंह यांनी त्यांच्यावर नोंदवलेल्या एफआयआरविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने त्यांच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या केसमध्ये आरोपपत्र दाखल न करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. या याचिकांवरील सुनावणी ९ फेब्रुवारीपासून घेण्यात येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. करण जोहरने केलेल्या याचिकेवर गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने या केसमधील आरोपींवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, असा आदेश पोलिसांना दिला होता.
हा कार्यक्रम खासगी प्रेक्षकांसाठीच करण्यात आला होता आणि त्या प्रेक्षकांनी यावर काहीच आक्षेप घेतलेला नाही. विनोद करण्यासाठी अशी भाषा वापरण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. (प्रतिनिधी)
अश्लील भाषा
२०१४ मध्ये मुंबईत ‘एआयबी रोस्ट’चा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अश्लील भाषा वापरल्याने पोलिसांनी करण जोहर, दीपिका पदुकोन, रणवीर सिंह आणि अन्य काही जणांवर एफआयआर नोंदवला.