मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आयोजित केलेले ‘जेल भरो’ आंदोलन हे प्रत्यक्षात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्यांचे ‘जेल जाने से रोको’ आंदोलन असल्याची टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तरुंगात गेले. माजी मंत्री छगन भुजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी सुरू आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ कोकणातील सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करीत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत त्यांना नोटीस पाठवल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. हा सर्व घटनाक्रम पाहता राष्ट्रवादीचे आंदोलन हे ‘जेल जाने से रोको’ याकरिता आहे.महाराष्ट्र भूषणच्या वादावेळीही राष्ट्रवादीने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण होईल असे प्रयत्न केले होते, असा आरोपही शेलार यांनी केला. कोणत्या कंत्राटदाराची जुनी बिले मंजूर करण्याकरिता तर हे राष्ट्रवादीचे आंदोलन नाही ना, असा सवालही शेलार यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
जेल भरो नव्हे, जेल जाने से रोको !
By admin | Published: September 14, 2015 2:53 AM