गटारात पडलेल्या मुलाचा शोध लागेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:25 AM2019-07-12T06:25:54+5:302019-07-12T06:25:58+5:30
गोरेगावमधील दुर्घटना; दीड वर्षाचा चिमुकला वाहून गेला
मुंबई : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील आंबेडकर चौक येथील गटारात दीड वर्षीय दिव्यांश सूरज धानसी हा मुलगा पडला. बुधवारी रात्री ही घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
दिव्यांशचा शोध घेण्यासाठी महापालिका, पोलीस, अग्निशमन दल व एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र कोणत्याच यंत्रणेला शोध घेण्यात यश आले नाही. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दीड वर्षीय दिव्यांश गटारात पडल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मुंबई अग्निशमन दलाला प्राप्त झाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत एनडीआरएफचे जवान तसेच मुंबई महापालिकेच्या डेÑनेज डिपार्टमेंटच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. ५० हून अधिक कर्मचारी दिव्यांशचा शोध घेत होते. गटारातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो मुख्य लाइनमध्ये वाहून गेल्याची भीती असल्याने त्यांनी डेÑनेज लाइनच्या १० किलोमीटर परिघात शोध सुरू केला. शक्य तेथे जेसीबीचीही मदत घेण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू होते.
‘...तर १९१६ या क्रमांकावर संपर्क साधा’
कुठेही गटार उघडे असल्याचे निदर्शनास आले तर त्वरित महापालिकेच्या १९१६ या क्रमांकावर माहिती द्यावी; किंवा टिष्ट्वटर हँडल, नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.