मुंबई क्रिकेटचा देदिप्यमान वारसा विसरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 01:51 AM2016-08-28T01:51:02+5:302016-08-28T01:51:02+5:30

बलाढ्य मुंबई संघाकडून खेळताना अमोल मुझुमदार या दिग्गज फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेट अक्षरश: गाजवले. पदार्पणात एकाच डावात सर्वाधिक धावा काढण्याचा पराक्रम केलेल्या या फलंदाजाने

Do not forget the legacy of Mumbai cricket | मुंबई क्रिकेटचा देदिप्यमान वारसा विसरू नका

मुंबई क्रिकेटचा देदिप्यमान वारसा विसरू नका

Next

बलाढ्य मुंबई संघाकडून खेळताना अमोल मुझुमदार या दिग्गज फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेट अक्षरश: गाजवले. पदार्पणात एकाच डावात सर्वाधिक धावा काढण्याचा पराक्रम केलेल्या या फलंदाजाने मुंबईला अनेकदा एकहाती विजयी केले. २००६-०७ मध्ये आपल्या नेतृत्वाखाली मुझुमदार यांनी मुंबईला रणजी जेतेपद मिळवून दिले. मात्र, देशांतर्गत क्रिकेट गाजवूनही या दर्जेदार खेळाडूला कधीही देशाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, ही खंत त्यांच्याप्रमाणे अनेक क्रिकेटप्रेमींना कायम सलते. सध्या मुंबईचा युवा संघ रणजी विजेतेपद कायम राखण्याच्या तयारीमध्ये लागलेला असताना ‘लोकमत’चे प्रतिनीधी रोहित नाईक यांनी मुझुमदार यांच्याशी संवाद साधला.

मुंबई क्रिकेटमधील प्रवासाबद्दल काय सांगाल?
- मी आज जो काही आहे तो मुंबई क्रिकेटमुळेच. आयुष्यभर मी मुंबई क्रिकेटचा ॠणी राहीन. मुंबई क्रिकेटचा इतिहास एवढा अफाट आहे की, ते ऐकूनच आम्ही मोठे झालो. शिवाय येथील सोईसुविधा इतक्या अत्याधुनिक व सुंदर असल्यामुळेच मुंबई दर्जेदार क्रिकेटपटूंची खाण झाली आहे.

तुम्हाला देशाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यातून स्वत:ला कसे सावरले?
- महत्त्वाचे म्हणजे, ती खंत होती, आता नाहीय. सुरुवातीचे ८-१० वर्षे मला खंत होती की, देशाकडून संधी मिळत नाही, पण त्यानंतर मी केवळ आपल्या खेळाकडे लक्ष दिले. मानसिकरीत्या अधिक सक्षम झालो. केवळ देशाकडून खेळल्यानेच तुमचे स्वप्न साकार होते, असे नाही. स्वप्न वेगवेगळी असू शकतात.
माझे स्वप्न चांगल्या स्तरावर
क्रिकेट खेळण्याचे होते, जे मी पूर्ण
केले. क्रिकेट भलेही सांघिक खेळ
असला, तरी स्वत:लाच स्वत:चे
करिअर घडवावे लागते. मीदेखील स्वत:ला सावरले. इंग्लंडला खेळायला गेल्यामुळे व्यावसायिक खेळाडू म्हणून तयार झालो. त्यातून खूप शिकलो आणि त्या नैराश्यातून बाहेर आलो. या वेळी माझ्यामागे माझा परिवार खंबीरपणे उभा होता.

माजी कर्णधार म्हणून आत्ताच्या मुंबई संघाला काय संदेश द्याल?
- पूर्वी एक म्हण होती की, मुंबई क्रिकेट भक्कम राहिले, तर भारतीय क्रिकेट भक्कम राहील, त्याबद्दल शंका नाही. आज म्हटले जाते की, पूर्वीप्रमाणे ८-९ मुंबईकर खेळाडू भारतीय संघात दिसत नाही.
आज ते शक्य नाही. मात्र, तरीही
आज रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे,
शार्दुल ठाकूर, श्रेयश अय्यर, धवल कुलकर्णी हे शिलेदार सध्या भारतीय क्रिकेट गाजवत आहेतच. त्यामुळेच सध्याच्या मुंबई संघाला एकच सांगेल
की, आपला जो देदिप्यमान वारसा
आहे, तो पुढे कायम ठेवा. जुन्या
खेळाडूंचे योगदान विसरू नका आणि एकूणच आपल्या मुंबई क्रिकेटची
संस्कृती पाहता, आजची पिढी हे योगदान नक्कीच विसरणार नाही, याची खात्रीही आहे. जिंकणे हेच मुंबई क्रिकेटच्या रक्तात आहे. जेव्हा तुम्ही युवा असता, तेव्हाच रणजी जिंकायला पाहिजे. यामुळे त्या विजयाची चटक लागते. म्हणूनच हे यश लवकर चाखले, तर ते कायम राखण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही.

कारकिर्दीच्या एका वळणावर तुम्ही आसामला जाण्याचा घेतलेला निर्णय किती कठीण होता?
- खूप कठीण निर्णय होता तो. मी आयुष्यात कधीही बाहेर जाऊन खेळण्याचा विचार केला नव्हता.
मुंबई माझे सर्वस्व होते, पण काही कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागला. शिवाय मला माहीत होते की, माझ्यात अजूनही ३-४ वर्षांचे क्रिकेट शिल्लक असताना ते वाया का घालवायचे? त्यामुळेच केवळ खेळण्यासाठी मी आसामची वाट धरली. जे मुंबईसाठी केले, तेच तिथे करायचे होते.

लोढा पॅनलच्या शिफारशींचा बीसीसीआयवर किती परिणाम होईल?
- परिणाम तर भलताच मोठा असून, ते ३-४ वर्षांनी नक्की कळेल. काही गोष्टी मला पटल्यात. काही गोष्टींमध्ये सुधारणा केल्या, तर बरे आहे, पण एक म्हण आहे, ‘जे होते ते भल्यासाठी’, त्याप्रमाणे आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे या शिफारशी पाळणे अनिवार्य आहे. सुप्रीम कोर्टची मोहोर पडल्यानंतर दुसरे काही करता येणार नाही.

‘एक राज्य एक वोट’बाबत तुमचे काय मत आहे?
- हे अगदी चुकीच आहे. माझ्यामते यात सूट द्यायला पाहिजे होती. क्रिकेट राज्यांनुसार खेळता येते नाही. अनेक विभाग क्रिकेटमध्ये राज्य म्हणून
खेळवली जातात. ८२ वर्षे ही पद्धत सुरू आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. माझ्यामते रणजी खेळणाऱ्या संघांना वोटिंगचा अधिकार द्या आणि अधिक कोणाचा समावेश करणार असाल, तर त्यांनाही अधिकार द्या, पण या आधीच्या राज्यांना किंवा संघांना डावलू नका.

आचरेकर सरांबाबत काय सांगू?
सरांची शिकवण खूप ग्रेट होती. त्यांची दूरदृष्टी जबरदस्त होती. लेव्हल वन, टू, थ्री या कोचिंगमधल्या पद्धती आज आल्या आहेत. त्या वेळी असे काहीही नव्हते. तरीही त्यांनी एक ‘भारतरत्न’ घडवला. सचिन तेंडुलकर एक उदाहरण आहे, पण त्याहूनही हजारो क्रिकेटर त्यांनी असे घडवले, ज्यांचे आयुष्य आज केवळ आचरेकर सरांमुळे सुरळीत सुरू आहे. त्यांची शिकवण संस्कार कधीच विसरू शकत नाही.

‘शारदाश्रम... स्कूल आॅफ क्रिकेट’
ज्या शाळेतून क्रिकेटचे धडे गिरवले, त्या शारदाश्रम शाळेला मुझुमदार यांनी ‘स्कूल आॅफ क्रिकेट’ संबोधताना म्हटले की, ‘शारदाश्रम शाळेमुळेच माझी ओळख निर्माण झाली. तिकडचे वातावरण वेगळेच होत. आम्ही कधीही मैदानावर पराभवाच्या भीतीने उतरलो नाही. कायम जिंकण्याच्या निर्धारानेच खेळल्याने आमची देहबोली आजही सकारात्मक आहे.’

Web Title: Do not forget the legacy of Mumbai cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.