मुंबईतील वाहतुकीची समस्या ही तर मुंबईकरांची डोकेदुखी झाली आहे. उपनगरी रेल्वेवर पडणारा अतिरिक्त ताण, प्रवाशांची वाढती संख्या यावर उपाय म्हणून दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही मेट्रोचे जाळे उभारण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएकडून मुंबईत मेट्रोचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही केले जात आहेत. सध्या मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर एकमेव मेट्रो सेवा सुरू आहे. मेट्रो २, ३, ७ या प्रकल्पांचे कामही वेगाने सुरू आहे. पण या प्रकल्पांच्या कामात न्यायालयीन स्थगिती, पर्यावरणवाद्यांचा विरोध, रात्री-अपरात्री मोठ्या आवाजात होणाऱ्या कामांमुळे स्थानिक रहिवाशांच्या रोषाला मेट्रो प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. एमएमआरडीए प्रशासन या सगळ्यातून वाट काढून निर्धारित वेळेत प्र्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांचे हे प्रयत्न मेट्रोचे जाळे सुसज्ज करण्यात नक्कीच पुरे पडतील का? या बहुपयोगी प्रकल्पांकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांना नेमके काय वाटतेय याबाबत ‘लोकमत’च्या वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया.मेट्रोचे जे काही प्रस्तावित प्रकल्प आहेत ते आम्ही निर्धारित वेळेतच पूर्ण करू असा आम्हाला विश्वास आहे. एमएमआरडीए प्रशासनाचा प्रत्येक अधिकारी याचसाठी दिवसरात्र कष्ट करतोय. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. मोठ्या प्रमाणावर जेव्हा कोणतेही मोठे प्रोजेक्ट होत असतात तेव्हा अडथळे हे येतच असतात. आम्ही मान्य करतो की न्यायालयाचे निर्णय आमच्या विरोधात गेले, काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध आहे. पण या सगळ्यातून आम्ही मार्ग काढत आहोत. मुंबईकरांना उत्तम सेवा देण्यासाठी या सर्व अडचणींवर मात करून एमएमआरडीए प्रशासन मेट्रोचा प्रत्येक प्रकल्प त्याच्या दिलेल्या प्रस्तावित वेळेतच पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास आहे.- दिलीप कवठकर, प्रकल्प संचालक, एमएमआरडीएमेट्रोचे काम सुरू करण्यापूर्वी एमएमआरडीए प्रशासनाला भविष्यात उद्भवणाºया सगळ्या अडचणींची माहिती नव्हती का? मुंबईसारख्या शहरात जिथे जागांचा तुटवटा आहे, तिथे एमएमआरडीए प्रशासनाने मुंबईकरांना त्रास होणार नाही याप्रमाणे आपल्या प्रकल्पांची आखणी करणे गरजेचे होते. ते केले असते तर आता ज्या अडचणी येत आहेत, त्या सतत आल्या नसत्या. आम्हाला आमच्या फायद्यासाठी मेट्रो प्रकल्प निश्चितच हवे आहेत. पण हे प्रकल्प असे अडकणार असतील तर उपनगरीय लोकलमध्ये धक्के खातच आम्हाला पुढची काही वर्षे प्रवास करावा लागणार.- अक्षय कोराडे, कुर्लामुंबईतील रहदारीच नव्हे, तर वाहने व लोकसंख्येची सतत वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून ‘मेट्रो’चा पर्याय समोर आणण्यात आला. या मेट्रोच्या यशस्वी योगदानाने थोडाफार फरक पडला, त्यामुळे मुंबईकर सुखावले. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावू लागली. रस्त्यांवरील गर्दीचे प्रमाण कमी झाले. हे जाळे विस्तारण्यासाठी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पण यात अनेक अडचणी येत आहेत. जर अन्य मार्गावरील मेट्रो सुरू झाली तर दुप्पट झालेली गर्दी नियंत्रणात येईल. त्यामुळे प्रवाशांनी आता होणारा त्रास थोडा सहन करून सर्वांच्या हितासाठी मेट्रोला सहकार्य करायला हवे.- प्रमोद पावसकर, विरारमेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास तशा कोणत्याच मोठ्या अडचणी नाहीत. मुळात आरे कारशेडसाठी मेट्रो प्रशासन अडून का बसले आहे, याबाबत थोडी साशंकता वाटते. कांजूरमार्ग, विक्रोळी भागात आरे कारशेड उभारण्याइतकी विस्तृत जागा आहे. त्यामुळे न्यायालयाचे खेटे मारण्यापेक्षा या पर्यायी जागेवर त्वरित कारशेडचे काम सुरू करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यावरणवाद्यांसह विरोध होणाºया विभागातील रहिवासी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर समन्वय साधला तर हे प्रश्न सोडविण्यात मदत होईल. सरकारनेही यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्थेसमोर जर सर्वांना पटतील असे पर्याय मांडण्यात आले तर ज्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे, त्यावरील बंदी न्यायपालिका नक्की उठवेल असा मला विश्वास आहे. मुळात मुंबईकर नागरिकांनीही विरोध न करता अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. - राहुल खैरनार, माहीममुंबईत याआधीच बिल्डरांनी बराचसा निसर्ग आपल्या फायद्यापोटी गिळंकृत केला आहे. मुंबईत निसर्ग वाटेल अशी आरे ही एकमेवच जागा उरली आहे. आता त्यात आरेच्या जागेलाच मेट्रो धक्का पोहोचवणार असेल तर ते बरोबर नाही. मेट्रोच्या कामांमुळे याआधीच या भागात अमाप झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ‘मुंबईकरांना दिलासा देणारे प्रकल्प’ या नावाखाली निसर्गाची हानी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल अतिशय योग्य आहे. प्रशासनाने सर्व बाबींचा योग्य विचार करूनच प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा ºहास होऊन विकास करण्याचा प्रयत्न हा भविष्यात पर्यावरणाचा नाश होण्यास कारणीभूत ठरेल.- गंगाधर कोठावळे, नालासोपारामेट्रोच्या प्रकल्पांमध्ये अडथळे येत असतील तर तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन सोडविणे गरजेचे आहे. आज मुंबईत रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. मध्य, पश्चिम, हार्बर या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर गर्दीच्या वेळेत ट्रेनमधून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. मेट्रोचे विविध प्रकल्प या वाढलेल्या गर्दीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमुळे सीप्झ एमआयडीसीमध्ये जाणाºया अनेक चाकरमान्यांचा वेळ वाचत आहे. अशाच प्रकारे मुंबईतील इतर ठिकाणीही हे प्रकल्प फायद्याचे ठरणार आहेत. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात हे प्रकल्प अडकून राहिले तर मुंबईकरांना भविष्यात मिळणारा हा चांगला प्रकल्प फक्त एक दिवास्वप्नच बनून राहील.- अशोक बनसोडे, घाटकोपरमेट्रो ३ हा कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्प संपूर्णत: भुयारी आहे. दक्षिण मुंबईत सुरू होणारा हा प्रकल्प पश्चिम द्रुतगती मार्गाला एक पर्याय म्हणून उपलब्ध होणार आहे. चर्चगेट, फोर्ट परिसरातून अंधेरी, वांद्रे व पुढे बोरीवलीपर्यंत लाखो चाकरमानी या मार्गावर प्रवास करतात. या प्रवाशांना या भुयारी मेट्रो मार्गाचा एक समर्थ पर्याय उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ताण यामुळे कमी होणार आहे. हा प्रकल्प दादर, परळ या गजबजलेल्या मुंबईतील महत्त्वांच्या ठिकाणांहून भुयारी मार्गाने जात आहे. येथील रहिवाशांना इथे होत असलेल्या कामांचा भलेही त्रास होत असेल; पण भविष्यात याच प्रकल्पामुळे वाहतूक जलदगतीने होणार असल्याने आपण विरोध करणे सोडून दिले पाहिजे.- अण्णासाहेब नवले, चिंचपोकळीमेट्रो प्रकल्पांचे जाळे विस्तारणे हे फारच गरजेचे आहे. यासाठी आपण दिल्ली आणि दक्षिण भारतातील मेट्रोच्या पसरलेल्या विस्तृत जाळ्याकडे पाहिले पाहिजे. मुळात दिल्लीत वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र आज दिल्लीतील बहुसंख्य नागरिकांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तेथील वाहतुकीवरील ताण काही अंशी कमी झाला. पण न्यायलयीन कचाट्यात सापडून जर हे प्रकल्प जर असेच रखडत बसणार असतील तर प्रकल्प नुसते जाहीर करून उपयोग नाही. हे प्रकल्प मुंबईकरांच्या हिताचे आहेत. तेव्हा केंद्र सरकार, राज्य सरकारने यात पुढाकार घेऊन वेळेत या समस्यांचा निपटारा करणे गरजेचे आहे. - स्नेहल भिडे, ठाणेमेट्रोचे सुसज्ज जाळे मुंबईत होणे गरजेचे आहेच, मात्र प्रशासनाने निसर्गाला धक्का पोहोचणार नाही याकडेही बारकाईने लक्ष दिले पाहिजे. आरे कारशेड जर निसर्गाला हानी पोहोचवून होणार असेल तर अशा प्रकल्पांना काही अर्थ नाही. मुंबईत नावाला उरलेला निसर्ग जर प्रकल्प गिळंकृत करायला निघाले तर पुढे पर्यावरणाची किती हानी होईल याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. प्रकल्प मुंबईकरांच्या फायद्याचे आहेत यात वादच नाही; मात्र हे प्रकल्प निसर्गाची हानी करून राजरोसपणे सुरू असतील तर याला विरोध योग्य आहे.- सीमा गोळे, वर्सोवा
कायद्याच्या कचाट्यात मेट्रोचे जाळे अडकायला नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 3:42 AM