Join us

'गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलंत, तर 'मातोश्री'वर कॅमेरे लागतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 9:05 AM

राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी 30 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई:  राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी 30 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार असून काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकासआघाडीच्या विस्ताराआधी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. 

शिवसेनेने गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्यास 'मातोश्री'वर देखील कॅमेरे लागतील. तुम्ही अर्थखातं, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग दिलं. त्यामुळे आता गृहमंत्रिपद देखील दिलं तर मग तुमच्याकडे ठेवलं काय फक्त मुख्यमंत्रिपद? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या अनेक वर्षापासून एकत्र काम केल्यामुळे शिवसेनेने गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये असा प्रेमळ सल्ला देतो असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

२८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्यासमवेत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी तात्पुरते खाते वाटप करण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी, याविषयी उत्सुकता होती. राज्याचं गृहमंत्रीपद हे सध्या शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे गृहमंत्री आहेत, पण मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विधानसभा सदस्यांची संख्या २८८ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ४३ मंत्री घेतले जाऊ शकतात. सहा मंत्री पूर्वीच आहेत. त्यामुळे आता उर्वरित ३६ मंत्र्यांचा समावेश ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलमहाराष्ट्र सरकारभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस