''जिंकतात म्हणून गुंडांना तिकीट देऊ नका''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:55 AM2018-10-26T04:55:42+5:302018-10-26T04:55:45+5:30
निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे म्हणून गुंडांना तिकीट द्यायचे हे बरोबर नाही, अशा कानपिचक्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांना दिल्या.
मुंबई : निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे म्हणून गुंडांना तिकीट द्यायचे हे बरोबर नाही, अशा कानपिचक्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांना दिल्या.
राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निवडणुकांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये, असे राज्यपाल म्हणाले. ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आणि आयोगाचे सचिव शेखर चन्ने या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, निवडणुकांमध्ये मतदान आणि उमेदवार अशा दोन्ही बाजूने पारदर्शकता असायला हवी. प्रजेला अर्थात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयासाठी चढाओढ असते. सुदृढ लोकशाहीसाठी ते टाळण्याकरिता कामाचे स्पष्टपणे वर्गीकरण झाले पाहिजे.
विखे-पाटील म्हणाले, सुदृढ लोकशाहीसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि स्वतंत्र स्थान राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोग शासनापेक्षा पूर्णत: स्वतंत्र आहे, हे भान राज्य शासनाने कायम राखावे. सहारिया यांनी परिषदेमागील भूमिका स्पष्ट केली.
>महाविद्यालयांत डेमॉक्रसी क्लब
दुर्बल, दिव्यांग आदी सर्वच वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. लोकशाहीत युवकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांना सोबत घेऊन समावेशकता वाढविली पाहिजे. तेथे डेमॉक्रसी क्लब स्थापन करायला हवेत व समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.