Join us  

नापासांनो, अजिबात हिरमुसून जाऊ नका!

By admin | Published: June 19, 2014 2:26 AM

दहावीचा निकाल लागला आणि सर्वत्र एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मुंबई : दहावीचा निकाल लागला आणि सर्वत्र एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तुला किती टक्के मिळाले, या प्रश्नावर सध्या ऐकू येणारी आकडेवारी म्हणजे ९० टक्के, ९५ टक्के इतकी प्रचंड. या आनंदात आपल्या काही मित्रांना कमी टक्के अथवा नापासचा रिझल्ट आला असेल, त्यांनी हिरमुसून न जाता जोशाने याला सामोरे जा, असा सल्ला मानसशास्त्रज्ञांनी दिला आहे.परीक्षेत नापास होणाऱ्यांपेक्षा कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिक धक्का बसतो. अपेक्षित गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांना इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी निर्माण होतात, असे मानसशास्त्रज्ञ वृषाली पाटणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याचबरोबर काही गुणांनी नापास झालेला विद्यार्थी देखील अधिक डिप्रेशनमध्ये जातो.अशा वेळी पालक आणि पाल्यामध्ये संवाद साधणे गरजेचे असते, असेही सांगितले. विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे वागावे याबद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, पालकांनी पाल्याला आधी अभ्यास केला असता तर आता रडत बसावे लागले नसते, सांगितले होते कमी टीव्ही पाहा,’ यांसारखे टोमणे न मारता, जुन्या गोष्टी न उकरता त्यांना यापुढे आता काय करायला पाहिजे, याचे मार्गदर्शन करावे.दहावीची परीक्षा ही अंतिम परीक्षा नाही, हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे. आवडते करिअर क्षेत्र निवडायला दुसरेही मार्ग उपलब्ध आहेत. कमी गुण मिळाले आहेत म्हणून डिग्री करता येत नसते, तर त्याच क्षेत्रात डिप्लोमाही करता येऊ शकतो. त्यामुळे डाव्हर्जनची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे.पालकांकडून, नातेवाइकांकडून चिडवणे, बोल लावणे असे घडत असेल तर यामुळे विद्यार्थी खचून जाऊ शकतो. अशा वेळेस विविध विचार त्याच्या मनात येऊ शकतात. जसे की, घर सोडून पळून जाणे, स्वत:ला शारीरिक त्रास करून घेणे किंवा आत्महत्या यांसारखे विचार येत असतील तर त्यांनी जवळच्या मित्राशी किंवा कोणत्याही नजीकच्या व्यक्तीशी बोलावे. तसेच आता चाइल्ड हेल्पलाइन आणि समुपदेशक देखील आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी. आपल्या मनातील विचार मोकळे करावेत, जेणेकरून त्यांना या वाईट विचारांपासून परावृत्त होता येईल. याचप्रमाणे सध्या शाळांमध्ये आणि विविध संस्थांतर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे राबवली जातात. त्यांना उपस्थित राहून विचारांना चालना द्यावी, असेही पाटणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)