समुद्राला येणार उधाण, येते ३६ तास समुद्रात जाऊ नका; भारतीय हवामानशास्र विभागाचा इशारा
By जयंत होवाळ | Published: May 4, 2024 08:29 PM2024-05-04T20:29:09+5:302024-05-04T20:30:45+5:30
शनिवारपासून समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मुंबई : येत्या ३६ तासात समुद्रात जाणार असाल तर सावधान ! समुद्राकडे अजिबात फिरकू नका. समुद्रात भरतीच्या वेळी उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने हा इशारा दिला आहे. शनिवारपासून समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
हा इशारा लक्षात घेता, किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होऊ शकते . त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनीही योग्य ती खबरदारी बाळगावी.किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवाव्यात , जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही. तसेच समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण परिस्थितीवर पालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात शिरू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.