३१ हजारांच्या घरातील सोन्याला ‘भाव’ नाही!
By admin | Published: May 10, 2016 02:00 AM2016-05-10T02:00:07+5:302016-05-10T02:00:07+5:30
दीड महिन्याच्या बंदनंतर सोमवारी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोठ्या मुहूर्ताची संधी आल्याने ठाणे-रायगडमधील सराफांमध्ये उत्साहाचे वातावरण होते
डोंबिवली : दीड महिन्याच्या बंदनंतर सोमवारी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोठ्या मुहूर्ताची संधी आल्याने ठाणे-रायगडमधील सराफांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, गेल्या १५ महिन्यांतील सोन्याने एकदम उच्चांक गाठल्याने भाव २६ हजारांवरून ३१ हजार रुपये तोळ्यावर गेले. अचानकपणे पाच हजारांनी भाव वाढल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे दिवसभरात अपेक्षेप्रमाणे ग्राहक न आल्याने सराफांच्या उत्साहावर पाणी फिरले.
आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे संचालक, ठाण्यातील ‘चिंतामणी’ ज्वेलर्सचे मालक नितीन कदम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एवढा मोठा मुहूर्त असून केवळ भाववाढ झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्केही ग्राहक आले नाहीत. अचानकपणे झालेली पाच हजार रुपयांची वाढ हे एकमेव कारण असल्याचेही ते म्हणाले. दोन ते पाच ग्रॅमच्या नाणी खरेदीसाठी काहीशी गर्दी असली, तरी मुहूर्ताचे सोने म्हणून मात्र जी खरेदी व्हायची, ती मात्र झालेली नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य भागांतील लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांची ही अवस्था असल्याचे ते म्हणाले. परिणामी, सराफांमध्ये नाराजी आहे. घडणावळीसह अन्य कलाकुसरीच्या दरांवर काहींनी सवलत जाहीर केली होती, तर काही व्यापाऱ्यांनी विशेष आॅफर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तोदेखील फोल ठरला.
आता गुरुपुष्यामृत या दिवशी किती प्रतिसाद मिळतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल, असेही ते म्हणाले. मात्र, अक्षयतृतीयेसारख्या मोठ्या मुहूर्ताकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने गुरुवारचा मुहूर्तही पाण्यात जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
डोंबिवलीत पूर्वेत सोमवारी दुकाने बंद असतात. त्याचा फटका सराफांना बसला. संध्याकाळनंतर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, तर काही ठिकाणी आधी घेतलेल्या आॅर्डरनुसार सोने देण्याची सोय करण्यात आली होती. मांडव घालण्यात आले होते.