Join us

कमरेला घोडा अन चेन नको

By admin | Published: October 10, 2015 12:02 AM

कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता-सतर्कता बाळगण्यासाठी ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांमधून राजकीय

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता-सतर्कता बाळगण्यासाठी ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांमधून राजकीय लोकप्रतिनिधी, नगरसेवक आदींसह त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची शस्त्रे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रामनगरसह टिळकनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार शेकडोंच्या संख्येने ‘लायसन्स’असलेली शस्त्रे राजकारण्यांकडे असून ती जमा करण्यात यावी, यासंदर्भात संबंधितांना संदेश दिले आहेत. ही आकडेवारी बघता जर लोकप्रतिनिधी असुरक्षित असतील तर ते जनतेची सुरक्षा कशी करणार, असा सवाल डोंबिवलीकरांचा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कमरेला घोडा अन् गळ्यात चेन असा उमेदवार नको रे बाप्पा, अशा पद्धतीने नागरिकांमध्ये आपापसांत कुजबूज सुरू झाली आहे.कल्याण-डोंबिवलीत विशिष्ट समाजाच्या नगरसेवकांचे प्राबल्य अधिक असून त्यांच्या आपापसांत तसेच कौटुंबिक वादांमुळे त्यांच्याकडे परवानगी असलेली शस्त्रे आहेत. कुठेही बाहेर पडताना ते त्यांच्याकडे असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याशी चर्चा करताना अथवा समस्या मांडताना सावधानता आणि अंतर राखूनच चर्चा करतो. परिणामी, सर्व समस्या सुटलेला एकही वॉर्ड डोंबिवलीत नाही.एकीकडे सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या असताना बहुतांशी लोकप्रतिनिधी मात्र एक से बढकर एक सोन्याच्या चेन, हातात ब्रेसलेट आणि बोटात अंगाला शोभणार नाहीत एवढ्या मोठ्या अंगठ्या घालून जनतेसमोर जातात. त्यालाही सर्वसामान्यांमध्ये अंथरूण पाहून पाय पसरण्याची सवय असल्याने जाताना जपूनच सामोरे जातात. त्यामुळे बहुतांशी वेळा लोकप्रतिनिधीची इच्छा असली तरी नागरिकच त्यांच्याकडे जाण्यास धजावत नसल्याचे जाणवते. यात सर्वपक्षीयांचा समावेश आहे. ठिकठिकाणच्या पायाभूत सुविधांची वानवा असतानाच टारगटांच्या घोळक्यांतून लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचण्याचीही हिम्मत होत नाही. त्यामुळेही समस्या जैसे थे आहेत. वॉर्डांत कचराकुंडीमुक्त वॉर्ड हे नावालाच आहेत. मतदारांच्या अपेक्षा वाढल्या होतकरु उमेदवाराला पाठिंबानगरसेवक होण्याआधीची लोकप्रतिनिधींची अवस्था आणि झाल्यानंतर पाच वर्षांची स्थिती बघता हे सारे कसे झाले, याचे उत्तर सर्व संबंधितांना मिळते. दुचाकी नसली तर ती, ती असेल तर चारचाकी, त्यासोबतच आणखी बरेच काही असे कसे काय होते, असा सवाल आता नागरिकांमध्ये चर्चेला आहे. त्यामुळेच एकीकडे भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी मतदारांनी दिल्लीत सत्तांतर घडवले, परंतु स्थानिक पातळीवरील चित्र मात्र अद्यापही जैसे थे आहे. ते बदलण्याची संधी असताना आता काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.स्थानिक पातळीवरील नागरिकांमध्ये ही चर्चा असली तरी त्यात बदल होणे आवश्यक असून त्यासाठी मतदान जास्तीतजास्त व्हावे आणि चांगल्या (काम करणाऱ्या आणि होतकरू) उमेदवाराला पाठिंबा दिला जाणे आवश्यक आहे. अन्यथा, उगवत्या पिढीचे भवितव्य शहरासह राजकारणाच्या दृष्टीने प्रचंड धोक्याचे असेल, अशी शक्यताही ज्येष्ठांनी लोकमतजवळ व्यक्त केली.