शारीरिक अन् मानसिकही इजा नको; विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्याचे नव्याने आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:12 PM2018-06-02T23:12:24+5:302018-06-02T23:12:24+5:30
शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशा प्रकारची शिक्षा करता कामा नये, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने शनिवारी काढला. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनाच विभागाने जारी केल्या आहेत.
मुंबई : शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशा प्रकारची शिक्षा करता कामा नये, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने शनिवारी काढला. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनाच विभागाने जारी केल्या आहेत.
सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेटी बसवावी, शाळेच्या आवारात आणि प्रवेश द्वारावर, तसेच बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ पुरेसे सीसीटीव्ही बसवावेत, शाळेत जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठीच्या दरवाजावर पुरुष अथवा महिला सुरक्षा रक्षक नेमावा, मुलांची उपस्थिती सकाळी, दुपारी व शाळा सुटण्याच्या वेळी घ्यावी आणि गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसने माहिती द्यावी, असे विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
शाळा व्यवस्थापनाने शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी यांचा समावेश असलेली दक्षता समिती नेमावी आणि पालक समितीसोबत चर्चासत्र घ्यावे, विद्यार्थी मानसिक दबावाला बळी पडू नयेत, म्हणून व्यवस्थापनाने शाळेतच समुपदेशनाची व्यवस्था करावी, स्कूल बसमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस बसण्याची अनुमती नसावी, बसचालकांनी विद्यार्थ्यांना इच्छित स्थळीच पोहोचवावे, बसमधून प्रवास करणाऱ्या शेवटच्या मुलीला घराजवळ सोडेपर्यंत बसमध्ये महिला सेविका वा शिक्षिका असावी, शाळेतील मुली शालेय उपक्रम, स्पर्धेसाठी शाळेबाहेर जात असताना, त्यांच्याबरोबर महिला शिक्षक वा सेविका द्याव्यात, मुलींच्या प्रसाधनगृहात महिला सेविकांची सुविधा असावी, तसेच शिक्षक व कर्मचाºयांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक वा कर्मचारी नेमताना शाळा व्यवस्थापनाने शाळा व्यवस्थापनाने त्याचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याकडून घ्यावे, आकस्मिक प्रकरणी मुलांचे पालक किंवा नातेवाईक शाळेत उपस्थित होईपर्यंत मुख्याध्यापकांनी मुलांचा ताबा शक्यतो महिला शिक्षकाकडे द्यावा, असे बजावण्यात आले आहे.
चिराग अॅपची माहिती द्या़़़
विद्यार्थ्यांवर होणाºया अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत पोक्सो इ-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती, तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘चिराग’ या अॅपची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी सूचना फलक शाळेत लावावेत.
त्यावर तक्रार नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी. बालकांविरुद्ध होणाºया लैंगिक अपराधाबाबत माहिती असणाºया व्यक्तीने त्याबाबत तत्काळ विशेष किशोर पोलीस पथकास (स्पेशल ज्युवेनाइल पोलीस युनिट) अथवा संबंधित पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.