Join us

वाढीव भाडे घेऊ नका, खासगी ट्रॅव्हल्सवर असणार आरटीओचा ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:04 AM

अवाच्या सव्वा दर आकाराल तर खबरदार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवाळीच्या काळात जास्तीचे भाडे आकारणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या खासगी बसचालकांवर आरटीओने विशेष मोहीम राबवीत कारवाई केली. नोव्हेंबर महिन्यात वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यात शेकडो वाहनांवर  कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 

नागरिकांनी तक्रार करावीप्रवासादरम्यान मनमानी भाडे आकारणाऱ्या, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या संबंधित खासगी बससंदर्भात नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी. दोषी आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय-काय तपासले जाते?

 पथकाकडून वाहनांची सर्व कागदपत्रे जसे- नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. चालकाची अनुज्ञप्ती व बॅज तपासले जाते. यासोबतच वाहनांतील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन दरवाजा, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत आहे का, हे तपासले जाते.  वाहनातील वेग नियंत्रक अथवा आसन व्यवस्था यातील अनधिकृत बदल देखील तपासले जातात. बस संचालकाने प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी केली असल्यास अथवा प्रवाशांची फसवणूक केल्यास कारवाई करण्यात येते.  मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या दोषी बसचालक व मालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येते.

विशेष पथक असते सक्रियमुंबईत गणेशोत्सवापासूनच प्रवासी संख्येत वाढ होते. यात गणपती, नवरात्री व त्यानंतर दिवाळी येत असल्याने प्रवाशांची संख्या वाढते. अशात आरटीओचे विशेष पथक गठित करून ते नजर ठेवून असते.

एसटीसह खासगी टॅव्हल्समध्येही गर्दी पाहायला मिळते. मात्र, प्रवाशांची गरज ओळखून ट्रॅव्हल्स चालक अवाच्या सव्वा दर आकारतात. नाइलाजाने प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन जावे लागते. ट्रॅव्हल्सवरील कारवाई आणखी कठोर व्हावी.- लक्ष्मण लांडगे, प्रवासी

टॅग्स :मुंबईआरटीओ ऑफीस