Join us

घरगुती विजेच्या दरात वाढ करू नका; राज्य वीज नियामक आयोगाला ऑनलाइन सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 10:20 AM

जनसुनावणी दरम्यान जवळपास १० ग्राहकांनी त्यांच्या हरकती नोंदविल्या. 

मुंबई : घरगुती वापरासाठी असलेल्या ० ते १०० आणि १०१ ते ३०० युनिट विजेच्या दरात वाढ करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या सूचना, हरकती टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांनी मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सुनावणीत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर मांडल्या. तर सुनावणी दरम्यान आयोगाने टाटा पॉवरला सबसिडीसाठी ० ते १०० आणि १०१ ते ३०० युनिट मधील ग्राहकांना एका स्लॅबमध्ये घेऊन या संदर्भात प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

टाटा पॉवरच्या प्रस्तावित वीज दरवाढीबाबत वीज नियामक आयोगाने ऑनलाइन जनसुनावणीचे आयोजन केले होते. यावेळी एकूण ५३ ग्राहकांनी या प्रस्तावित दरावर त्यांच्या हरकती, सूचना नोंदविल्या. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी जनसुनावणीला उपस्थित होत्या. तसेच जनसुनावणी दरम्यान जवळपास १० ग्राहकांनी त्यांच्या हरकती नोंदविल्या. 

टाटा पॉवरला आयोगाने ० ते १०० आणि १०१ ते ३०० युनिट ग्राहकांसाठी निर्धारित केलेल्या दरवाढीमागील कारणे विचारली.  विजेच्या दरासंदर्भातील संरचनेला तर्कसंगत बनवण्यासाठी सर्व निवासी विभागांमध्ये प्रस्तावित वीज दरात वाढ करण्याचे सूचविल्याचे टाटा पॉवरने सांगितले.

झोपड्यांत राहणारे ग्राहक ० ते ३०० युनिट वीज वापरणारे आहेत. या व्यक्ती हातावर पोट भरणाऱ्या आहेत. वीज दरवाढ झाली तर गरिबांना मोठा फटका बसेल. त्यामुळे याचिका रद्द करण्यात यावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा.- सुनील प्रभू, आमदार

गरिबांसाठी एक दर आणि श्रीमंतांसाठी एक दर असे असता कामा नये. सर्वांसाठी समान दर हवेत. वीज दरवाढीतला हा फरक मान्य नाही. अन्यथा ही याचिका रद्द करण्यात यावी.- मनीषा चौधरी, आमदार

टॅग्स :मुंबईवीजटाटा