मनोहर कुंभेजकर
मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. तर राज्य सरकार आणि महापालिकेने सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.तर यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पश्चिम उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्या देखिल सरसावल्या आहेत. काही गृहनिर्माण सोसायट्यांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे,तर 2 फुटांची मूर्ती ठेऊन विशेष म्हणजे सोसायटीच्या आवरतच सभासदांसाठी कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे यंदाचा गणपती उत्सव आणि येणारे सण कसे साजरा करायचा याची मराठी व हिंदी भाषेत नियमवलीच न्यू दिंडोशी एकदंत गृहनिर्माण सोसायटी इमारत क्रमांक 20 व 21 ने न्यू दिंडोशी एकदंत कॉ हौसिंग सोसायटी येथील 6 विंग मधील 168 सभासदांना या सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व सचिव समीर मसुरकर व कमिटीने जारी केली आहे. सोसायटीच्या गणेशोत्सवात कोणी भक्तांनी हार,फुले,प्रसाद व इतर खाद्यपदार्थ मंडपात आणू नये."श्री"च्या दर्शनाला येतांना मास्क लावणे बंधनकारक असून सुरक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करा. ज्या सभासदांच्या घरी गणपती आहे त्यांनी नातेवाईक,मित्रमंडळी अथवा सोसायटीतील इतर सदस्यांना आपल्या घरी गणपती व गौरीच्या दर्शनाला आमंत्रित न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा. दरवर्षी येथील 11 दिवसांचा गणेशोत्सव असतो आणि अनंत चतुर्थीला गणेश मूर्तीचे आरे तलावात रात्री उशिरा विसर्जन होते. मात्र यंदा कोरोनामुळे येथील सार्वजनिक गणपतीची शाडूची मूर्ती 2 फूटांची असून विशेष म्हणजे येथील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सोसायटीच्या मोकळ्या जागेत कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे अशी माहिती सुभाष कुलकर्णी व सचिव समीर मसुरकर यांनी दिली.
वर्सोवा,यारी रोड येथील इनलॅक्स नगर येथील सुमारे 292 सदनिका असंलेल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या एक प्रभाग एक गणपती या आवाहनाला प्रतिसाद देत आणि येथे जेष्ठ नागरिक व लहान मुले यांची जास्त संख्या लक्षात घेता,यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.तर सोसायटीच्या ज्या सभासदांच्या घरी गणपती आहे त्यांना विसर्जनासाठी येथील मोकळ्या जागेत कृत्रिम तलाव उभारण्यात आला असल्याची माहिती या सोसायटीची सचिव चंद्रमोहन खुशवा यांनी दिली.येथील सभासदांनी गणपतीच्या दर्शनाला नातेवाईक व मित्रमंडळींना गर्दी करू नये,नियमांचे पालन करा,मास्क लावा असा फतवा सोशल मीडियावरून येथील सभासदांना जारी केला असल्याची माहिती खुशवा यांनी दिली.
मालाड पूर्व नागरी निवारा समोरील,इन्फिनिटी आयटी पार्क जवळ 310 सदनिक असलेल्या इमारत क्रमांक 2 व 3 श्री समर्थ सहकारी फेडरेशनने देखिल यंदा नेहमीप्रमाणे 11 दिवसांचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून 2 फुटांचा गणपती बसवण्याचा निर्णय घेतला असून येथील घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे येथील उद्यानात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सुनील थळे व सचिव प्रकाश येजरे यांनी दिली.
गोरेगाव (पूर्व) पश्चिम दुर्तगती महामार्गा समोर असंलेल्या बिंबिसार नगर कॉ हौसिंग सोसायटीज असोसिएशनने देखिल येथील रहिवाश्यांसाठी नियमवली जारी केली आहे. 5 पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी करू नये,मास्क लावणे अनिवार्य आहे. मूर्ती 2 फूटांची असावी.कृत्रिम विसर्जनाची सुविधा येथील महापालिकेच्या शाळेच्या आवारात केली आहे.जेष्ठ नागरिक व लहान मुलांना विसर्जन स्थळी आणण्यास फेडरेशने बंदी घातली आहे अशी माहिती असोसिएशनचे सचिव विलास तावडे यांनी दिली.