विरार-डहाणू चौपदरीकरण रखडू नये
By admin | Published: February 28, 2015 11:05 PM2015-02-28T23:05:27+5:302015-02-28T23:05:27+5:30
शुक्रवारी सादर झालेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरात फारसे काही पडले नाही.
दीपक मोहिते ल्ल वसई
शुक्रवारी सादर झालेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरात फारसे काही पडले नाही. विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी ३ हजार ५५५ कोटी रू. ची तरतूद करण्यात आल्याची एकमेव बाब वगळता बाकी निराशाच आहे. हे चौपदरीकरणाचे काम २०२०-२१ पर्यंत पूर्ण करण्याचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे. परंतु बोरीवली-विरार दरम्यान काही वर्षापूर्वी झालेल्या चौपदरीकरणाचा अनुभव घेतलेल्या वसईकरांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.
विरार-डहाणू चौपदरीकरणाचा फायदा नक्कीच पालघर, बोईसर व डहाणूवासीयांना होईल परंतु या प्रकल्पाचे काम त्वरीत सुरू करणे व ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे रेल्वेच्या अधिकाऱ्याला शक्य झाले पाहिजे. बोरीवली-विरार दरम्यानचे चौपदरीकरण सुमारे ७ वर्षे रखडले होते त्यामुळे प्रकल्पाचा भांडवली खर्चही प्रचंड वाढला. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून अनेक आंदोलनेही झाली. तशी पाळी पालघर-डहाणूवासीयांवर येता कामा नये. मध्य रेल्वेवर काही नवीन गाड्या सुरू करण्यात येणार आहेत परंतु पश्चिम रेल्वेचा मात्र अधिकाऱ्यांना सोयीस्कररित्या विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सफाळे, पालघर, बोईसर, वाणगांव व नव्याने उभारण्यात आलेले उमरोळी या स्थानकामध्ये वाढणारी रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या सर्व रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे.
४तसेच प्रवाशांसाठी विविध योजना जाहीर करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वेवरील स्मार्ट कार्ड मशिन्स, सीसी टीव्ही कॅमेरे त्वरीत बदलणे गरजेचे आहे. अनेक रेल्वेस्थानकातील सुरक्षा संदर्भातील उपाययोजना अत्यंत तकलादू स्वरूपाच्या आहेत. त्याचा आढावा घेऊन सुरक्षेचे उपाय योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. एकंदरीत हा अर्थसंकल्प पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सुखदायक नसल्याचे दिसून आले आहे.