समाजसेवेचा घेतला वसा सोडू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:29 AM2017-07-19T03:29:56+5:302017-07-19T03:29:56+5:30

जेवणाचे १ लाख ५० हजारपेक्षा अधिक डबे मोफत वितरण करणाऱ्या दमयंती तन्ना. शाळेचा गणवेश, शैक्षणिक साधनसामग्री, शाळेची फी, खेळणी, कपडे इत्यादी

Do not leave fat taken by social service ... | समाजसेवेचा घेतला वसा सोडू नका...

समाजसेवेचा घेतला वसा सोडू नका...

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जेवणाचे १ लाख ५० हजारपेक्षा अधिक डबे मोफत वितरण करणाऱ्या दमयंती तन्ना. शाळेचा गणवेश, शैक्षणिक साधनसामग्री, शाळेची फी, खेळणी, कपडे इत्यादी मोफत पुरवित असलेल्या अर्चना सुरेश. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षण देत असलेल्या उमा मुथुराम आणि गरिबांसाठी शाळा चालविणारे जलालुद्दिन गाझी; या मंडळींनी समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. समाजोपयोगी काम करताना ‘घेतला वसा सोडू नका...’ असे म्हणत या दिग्गजांनी इतरांनाही समाजकार्याला हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.
मर्क इंडियाच्या वतीने सोमवारी मुंबईत आयोजित ‘हेल्पिंग ट्रू हीरोज्’ या कार्यक्रमात देशभरातील या चार असामान्य लोकांची निवड करण्यात आली. मुलुंड येथील निमिश तन्ना चॅरिटेबल ट्रस्टची सुरुवात एका स्वयंपाकघरापासून आणि दोन माणसांपासून झाली. आता १ लाख ५० हजारपेक्षा अधिक जेवणाचे डबे मोफत वितरित करण्याचा उपक्रम यांच्याद्वारे राबविला जात आहे. दमयंती तन्ना यांच्या निमिश या २२ वर्षीय मुलाचा ट्रेन अपघातात मृत्यू झाला. तन्ना कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पुढील जीवन जगणे त्यांना असह्य झाले. दु:खातून बाहेर कसे यावे? याचा मार्ग त्यांना सापडत नव्हता. त्या वेळी तन्ना यांनी मुलाच्या नावाने ट्रस्ट सुरू केला. ट्रस्टमार्फत २०१३पासून मोफत जेवणाचे डबे देण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला २७ लोकांना जेवणाचे डबे दिले गेले. समाजात काही लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. काहींना मुलांनी सोडून दिले आहे तर काहींचे जगात कोणीच नाही, अशा लोकांना तन्ना या मोफत जेवणाचे डबे देतात.
मुंबईजवळील डहाणू आणि पालघर ठिकाणच्या आदिवासी भागातदेखील जेवणाच्या साहित्याचे वाटप तन्ना करतात. डहाणू येथील चार बालवाडी ट्रस्टने दत्तक घेतल्या आहेत. या कार्यातून असामान्य समाधान मिळते व त्यांना आनंददेखील होत आहे. मला खात्री आहे की निमिश जिथे कुठे असेल, त्याला आमचा अभिमान नक्कीच वाटत असेल, असे तन्ना सांगतात.

- चेन्नईमधील उमा मुथुराम या पेशाने शिक्षिका असून त्यांनी ‘सरगु मोन्टसोरी स्कूल’ सुरू केले आहे. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना याद्वारे शिकवले जाते. समाजात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सिग्नलवर लहान मुले भिक्षा मागताना दिसतात. या मुलांसाठी शिक्षणाच्या वाटा उमा यांनी खुल्या करून दिल्या. यापैकी बरीच मुले पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांत प्रवेश घेत आहेत. ‘सुयम चेरिटेबल ट्रस्ट’शी असे १५०० लोक जोडले गेले आहेत. तसेच झोपडपट्टी भागात रक्त तपासणी आणि आरोग्य शिबिरदेखील मोफत घेतले जाते.

- हैदराबाद येथे राहणाऱ्या अर्चना सुरेश यांची ‘ब्रिंग अ स्माइल फाउंडेशन’ ही संस्था रस्त्यावर राहणाऱ्या गरीब मुलांसाठी काम करते. रस्त्यांवर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या मूलभूत गरजा भागत नाहीत. लोकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काहीतरी मदत करावी, या उद्देशाने अर्चना यांनी संस्थेची स्थापना केली. गरीब मुलांसाठी शाळेचा गणवेश, शाळेत उपयोगात येणारी साधनसामग्री, शाळेची फी, खेळणी, कपडे इत्यादी वस्तू फाउंडेशनमार्फत मोफत पुरविल्या जातात.
प्रत्येकाच्या घरात अशा काही जादा वस्तू पडून असतात. त्या वस्तूंचा वापर होत नसतो. तर ‘ब्रिंग अ स्माइल फाउंडेशन’ही अशा लोकांना संपर्क करून या वस्तू जमा करते. नंतर गरीब मुलांना त्यांच्या घरी किंवा शाळेत जाऊन देते. मागील पाच वर्षांमध्ये सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना याचा उत्तम फायदा झाला आहे. अधिकाधिक लोक पुढे आले तर आपण एकत्रितपणे खूपकाही करू शकतो, असे अर्चना सुरेश सांगतात.

- कोलकाता येथील गरीब मुलांची शाळा चालवणारे असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे जलालुद्दिन गाझी. गाझी यांनी गरिबीमुळे शिक्षण घेतले नाही. परंतु, माझ्या गावात कोणीही अशिक्षित राहता कामा नये, हे त्यांचे स्वप्न होते. गाझी यांनी ‘सुंदरबन ड्रायव्हिंग समिती’ स्थापन केली. या समितीमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. वाहन चालवण्यासाठी येणाऱ्या लोकांना गाझी सांगत की, तुम्हाला मी वाहन चालवणे शिकवतो. पण तुम्ही दिवसभराच्या कमाईतला छोटासा हिस्सा म्हणून पाच रुपयांची मदत गरीब मुलांच्या शाळेला करावी. जर ही अट मंजूर असेल तर तुम्हाला शिकवले जाईल. अशी मदत गाझींना मिळत गेली. तसेच गाझी स्वत: वाहन चालवताना प्रवाशांकडे पैशाची मदत मागत असत. कोणी मदत देत असे तर कोणी देत नसे. या मदतीवर गाझी यांनी सुंदरबनात गरीब मुलांसाठी दोन शाळा सुरू केल्या. शाळेत २१ शिक्षक, ४ कर्मचारी आणि ४२५ विद्यार्थी आहेत. सुंदरबनात महाविद्यालय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न असून, हे स्वप्न माझा मुलगा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांना आहे.

Web Title: Do not leave fat taken by social service ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.