वेसावकरांनो घराबाहेर पडू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 08:08 PM2020-04-19T20:08:58+5:302020-04-19T20:11:39+5:30
शिवसेनेचे वेसावकरांना भावनिक आवाहन
मनोहर कुंभेजकर
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर वेसावकरांनो घरा बाहेर पडू नका,सोशल डिस्टंसिंग शिवाय पर्याय नाही असे भावनिक आवाहन शिवसेनेने वेसावकरांना केले आहे.काल लोकमत ऑनलाईन आणि आज लोकमत मध्ये कोरोनाचे 14 रुग्ण या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते.या वृत्ताचे जोरदार पडसाद वेसावे कोळीवाडा परिसरात तसेच राजकीय व पालिका वर्तुळात उमटले.
वर्सोवा विधानसभेचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शिवसेना वर्सोवा ही जनसमोपदेश व सामाजिक कार्यात अग्रेसर असून दि,२४ मार्च रोजी लाॅकडाऊन अमलांत येण्यापूर्वी पासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार गजानन कीर्तिकर, तसेच विभागप्रमुख व परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अँड.अनिल परब यांच्या सूचनेनुसार विभागात करोना विषयीच्या जनजागृती मोहीमेत शिवसेनेचे वर्सोवा विभागातील पदाधिकारी अग्रेसरच होते माहिती लोकमतला दिली.
शिवसेनेच्या या पदाधिका-यांनी वेसावे गावातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन करोना विषयाचे गांभीर्य जनतेच्या लक्षात आणून द्यावयाचा सतत प्रयत्न केला व सोशल डिस्टंसिंग शिवाय पर्याय नाही व घराबाहेर पडू नका याचे प्रबोधन राजेश शेट्ये,नगरसेविका प्रतिमा खोपडे, सतिश परब यांनी केले.तसेच वस्त्यांमधील विविध मंडळाच्या पदाधिका-यांना सोबत घेऊन त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या व त्यांना स्थानिक नेतृत्व म्हणून आपापल्या विभागात लोकांना समजावण्याचा सल्ला दिला.
पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश)फणसे यांच्या सल्ल्यानुसार शाखा क्र ५९ चे शाखाप्रमुख सतिश परब यांनी तर सुरूवातीला रिक्षा मधून फिरून याभागात जनजागृती करण्यासाठी आघाडी घेतली.लाॅकडाऊन अमलांत आल्यानंतर सर्व प्रथम राजेश शेट्ये यांनी जितो जुहु चाप्टर या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरूवातीला १५०० अन्नाची पाकीटे स्लम एरियामध्ये वाटण्यास सुरूवात केली. आज सुध्दा २५०० अन्नाची पाकीटे गरीब वस्त्यांमध्ये वाटली जातात.स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी सुध्दा ही परंपरा चालू ठेवत रोज ८५० अन्नाची पाकीटे गरीब वस्त्यांमध्ये वाटत आहेत.विभागात स्वच्छतेवर भर देत सॅनिटाइजर चा वापर करून इमारती व विभाग स्वच्छ करण्यावर भर दिला.
येथील शिवसेनेतर्फे आजही जेव्हढे जीवनावश्यक धान्य गरीब वस्त्यांमध्ये वाटता येतील तेव्हढे धान्य वाटप करण्यात येत आहे. लहान मुलांना बिस्किटे वाटप, स्लम एरियामध्ये मास्क, ग्लोव्ह्ज चे वाटप या सारख्या समाजोपयोगी कार्य करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कार्य करण्यास आघाडीवर असणाऱ्या या शाखेचे सर्व सामाजिक स्तरावर कौतुक होत आहे अशी माहिती राजेश शेट्ये यांनी शेवटी दिली.