मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरू करू देणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:47 AM2017-08-02T02:47:00+5:302017-08-02T02:47:00+5:30
गिरणी कामगारांच्या घरांबाबात निश्चित धोरण जाहीर केले नाही, तर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर दिवाळी साजरू करू देणार नाही, असा इशारा गिरणी कामगारांच्या सभेत देण्यात आला आहे.
मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांबाबात निश्चित धोरण जाहीर केले नाही, तर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर दिवाळी साजरू करू देणार नाही, असा इशारा गिरणी कामगारांच्या सभेत देण्यात आला आहे. शासनाने गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांचे धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी गिरणी कामगार कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला होता. त्या वेळी हा इशारा देण्यात आला.
गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांतर्फे राज्याचे प्रधान सचिव सुमित मलिक यांनी भेट दिली. शिष्टमंडळात गिरणी कामगारांचे नेते गोविंद मोहिते, दत्ता इस्वलकर, जयप्रकाश भिलारे, निवृत्ती देसाई, प्रवीण घाग आणि इतर नेत्यांचा समावेश होता. तर शासनातर्फे मलिक यांच्यासोबत नगरविकास व म्हाडाचे सचिव आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबतचा निर्णय २९ सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन मलिक यांनी शिष्टमंडळाला दिले.
याबाबत गिरणी कामगारांचे नेते गोविंद मोहिते यांनी सांगितले की, शासनाने गिरणी कामगारांना घरे कुठे आणि कधी देणार? याचा आराखडा दोन महिन्यांत तयार करण्याचे आश्वासित केले आहे. संबंधित खात्यांनाही तसे आदेश देण्यात आले आहेत. एनटीसीच्या ६ गिरण्यांच्या जमिनीच्या बदल्यात एकच भूखंड देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी गिरणी कामगारांच्या मोर्चात सामील होत जाहीर पाठिंबा दर्शवला. शिवाय गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेससह माथाडी कामगारही गिरणी कामगारांच्या घरांच्या लढ्यात उतरतील, असे आश्वासित केले.