- अजय माळी, चित्रकारमुंबई - घरची परिस्थिती बेताची. वडील भाजी विकतात. कुटुंबातील कोणाचाच चित्रकलेशी दूरदूरचा संबंध नव्हता. पण चित्रकलेच्या आवडीपोटी धुळे जिल्ह्यातील एका खेडेगावातील अजय माळी याने मुंबई गाठली. तो सध्या जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये शिक्षण घेत आहे. तेथे त्याने पदवी पूर्ण केली असून, आता पदव्युत्तर पदवीची तयारी करीत आहे.
अजय लहानपणापासून चित्र काढायचा. त्याच्या चित्राचे अनेक जण कौतुक करायचे. यामुळे त्याला हळूहळू चित्रकलेबाबत आवड निर्माण झाली. गावातील एका शिक्षकाने त्याला आर्ट टीचर डिप्लोमा करण्याचा सल्ला दिला. धुळ्यात त्याने तो पूर्ण केला. त्यानंतर त्याला जे.जे. स्कूल आॅफ आर्टबद्दल माहिती मिळाली. त्याने तडक मुंबई गाठली, पण मुंबईत आल्यानंतर त्याच्या समोर राहण्याचा आणि खाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तो १५ दिवस आमदार निवासात राहिला. मित्राच्या मदतीने राहण्याची पुढे सोय झाली.आता त्याचे लक्ष्य होते जे.जे. स्कूल आॅफ आर्ट. हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेऊ, असे त्याने ठरवले होते. पण तशी वेळ त्याच्यावर आली नाही. येथे प्रवेश घेतल्यानंतर चित्रकलेच्या आधारानेच त्याचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च भागत आहे. आता त्याने प्रथम श्रेणी पदवी संपादन केली असून, यापुढे पदव्युत्तर पदवी घेण्याचा त्याचा विचार आहे. बरेच जण एखाद्या कलेकडे वळताना, तिच्या साहाय्याने आपल्यालानोकरी मिळेल, अशी अपेक्षा ठेतात. परंतु, नोकरीची अपेक्षा न ठेवता कलेकडे वळावे, असा सल्ला अजय इतर मुलांना देतो.