हेल्मेट वापरण्याचा सल्ला देणाऱ्या सचिनच्या ट्विटवर शाहरुखचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:22 AM2019-07-01T03:22:40+5:302019-07-01T07:38:56+5:30
'बॉलीवूडमध्ये २७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.'
मुंबई : शाहरूख खानने २५ जून रोजी बॉलीवूडमधील २७ वर्षे पूर्ण केली. हा आनंद साजरा करताना शाहरूख खानने दुचाकीवर फेरी मारतानाचा व्हिडीओ ट्विट केला होता, तसेच आपल्या चाहत्यांशी या व्हिडीओतून संवाद साधला, परंतु या व्हिडीओमध्ये शाहरूखने दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले नाही. चार दिवसांनी सचिनने त्यावर प्रतिक्रिया देत, ‘हेल्मेट वापरायला चुकू नको’ असा सल्ला दिला.
सचिनने शाहरूखच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय बाजीगर, हेल्मेट वापरायला चुकू नको, जेव्हा जेव्हा दुचाकी चालवशील, तेव्हा तेव्हा हेल्मेट वापरत जा. बॉलीवूडमध्ये २७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
सचिनचा हा सल्ला शाहरूखनेही स्वीकारला असून, मित्रा हेल्मेट घालून ऑन ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याबाबत तुझ्यापेक्षा अधिक चांगले कोण शिकवू शकते, मी माझ्या नातवंडांनाही सांगेन की, मला वाहन चालविण्याचे धडे महान सचिनने स्वत: दिले, असे उत्तर शाहरूख खानने दिले आहे.