Join us

आता पुन्हा म्याव म्याव घेणार नाही!

By admin | Published: April 28, 2015 1:47 AM

पंचविशीच्या आतले वय. हातात खुळखुळणारा पैसा आणि स्वत:च्या मर्जीने आनंदात जगण्याची इच्छा आणि वाईट संगत असे समीकरण जुळून आले आणि अमर (नाव बदलले आहे़) च्या आयुष्याचा मार्गच चुकला.

ओंकार करंबेळकर - मुंबईपंचविशीच्या आतले वय. हातात खुळखुळणारा पैसा आणि स्वत:च्या मर्जीने आनंदात जगण्याची इच्छा आणि वाईट संगत असे समीकरण जुळून आले आणि अमर (नाव बदलले आहे़) च्या आयुष्याचा मार्गच चुकला. एका घातक वळणावर त्याच्या आयुष्यात एमडी ड्रगचा (म्याव म्याव) प्रवेश झाला आणि सुरू झाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासाचा काळ. सलग तीन महिने एमडीचे परिणाम भोगल्यानंतर अमर सध्या औषधोपचार घेत आहे. गेल्या महिन्यापासून एमडीपासून तो दूर आहे. औषधोपचार झाल्यावरही पूर्ण बरे होऊन एमडीपासून इतरांनाही दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एमडीचा तुझ्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा प्रवेश कधी झाला ?३१ डिसेंबर २०१४च्या रात्री जल्लोष करीत असताना अचानक एका मित्राने एमडीची पुडी सगळ््यांसमोर आणली. सध्या सर्वत्र हेच घेतले जाते, असे सांगून त्या मित्राने एमडी घेण्याचा आग्रह सर्वांना केला. सुरुवातीला मी फार नकार दिला, मात्र मित्रांनी सांगितले की दारूपेक्षा एमडी जास्त बरे वाटते. जबरदस्त किक लागते. त्यामुळे आग्रहापोटी मी ते घेतले. पण एमडी घेतल्या घेतल्या एकदम हलके हलके वाटू लागले. अंगात एक प्रकारची शक्ती संचारली आणि आनंदी वातावरणात असल्यासारखे वाटू लागले. ड्रिंक्सनंतर एमडी घेतल्यावर तर आणखीच बरे वाटू लागले. आणि याच आनंदी भावनेच्या इच्छेसाठी एकदा मजा घेतलेल्या एमडीने व्यसनाचे रूप घेतले.पण व्यसन करण्याइतके एमडी कोठून मिळत असे ?सुरुवातीला नाकाद्वारे श्वासातून एमडी घेतलेले पुरत असे. नंतर त्याचा आवश्यक तो परिणाम होईनासा झाला. त्यामुळे दारूमध्ये मिसळून एमडी घ्यायला सुरुवात केली आणि त्याचाही परिणाम होईनासा झाल्यानंतर शेवटी इंजेक्शनद्वारे एमडीचा डोस घ्यायला सुरुवात केली. काही लोक गुटख्यात मिसळूनही हे ड्रग घेतात. मला एमडी चेंबूर परिसरातील ड्रग पेडलर्सकडून विकत घ्यावे लागे. प्रारंभीच्या काळामध्ये एक बुक (एक ग्रॅमचा डोस) पुरत असे. हा डोस ६०० रुपयांना मिळत असे़ आता त्यावर बंदी आल्यानंतर त्याची किंमत १००० रुपयांच्या वर गेली आहे. एमडी ड्रग विकणाऱ्या पेडलर्सचे नंबर मी मिळविले होते. त्यांना वारंवार फोन करावे लागत, तेव्हा खुप वेळाने ते दाद देत. अमुक ठिकाणी मीच उभा आहे याची अनेक वेळा खात्री केल्यानंतरच ते समोर येत व एमडीची पुडी देत. एमडी घेण्याच्या तीव्र इच्छेमुळे अत्यंत काकुळतीने विनंती करून ते हातात येईपर्यंत अजिबात धीर धरवत नसे, इतकी माझी वाईट स्थिती झाली होती. माझ्याप्रमाणे अनेक तरुणांना एमडीचे व्यसन लागल्याचे मी पाहिले आहे. तरुणच काय शाळेतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना याचे व्यसन करताना मी पाहिले आहे.एमडीचे व्यसन वाढत कसे गेले आणि त्याचा शरीरावर किंवा एकूणच सर्व गोष्टींवर कसा परिणाम झाला?काही काळानंतर मला एक बुकही पुरेनासे झाले. मग ते सारखे सारखे घ्यावेसे वाटू लागले. एक वेळ तर अशी आली, की दर दहा मिनिटाला एक बुक असा डोस लागू लागला. जर वेळेत डोस मिळाला नाही तर प्रचंड चिडचिड आणि राग येत असे. अनेक रात्री झोपही येत नसे. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पगाराचे साडेदहा हजार चारेक दिवसांत संपून जात. मग घरात बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने ठेवलेले पैसे चोरायला सुरुवात केली. प्रत्येक डोस घेताना मनात येई, आता हा शेवटचा डोस, आता नाही पैसे चोरायच़े़ असा केलेला निर्धार काही तासच टिकायचा. शरीराला लागलेले व्यसन शांत बसूच देत नव्हते. हातावर इंजेक्शन घेऊन घेऊन काळे डाग पडले होते. दोन्ही हातांच्या शिरांवर काळे डाग पडल्याने मी पूर्ण बाह्यांचे शर्ट्स घालायला सुरुवात केली. वजन लक्षात येईल इतके कमी झाले. डोळ््यांजवळ काळसर वर्तुळेही आली होती. सर्वात वाईट बदल म्हणजे स्वभाव अत्यंत चिडखोर झाला होता. सारखा राग येई. या धांदलीमध्ये माझी नोकरीही सुटली़ थोडक्यात सर्वच बाजूंनी मी अडकलो होतो. तुला एमडी व्यसन लागले आहे, हे घरी कसे समजले आणि त्यांची त्या वेळेस काय प्रतिक्रिया होती ?एके दिवशी लहान भाऊ टीव्ही पाहात असताना मी घरी एमडीचा डोस घेत होतो. अचानक त्याने मला पाहिल्याने मी ड्रग घेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने घरी आई, वडील व बहिणींना सांगताच घरात कोलाहल माजला. आईवडील, मोठ्या बहिणींना खूपच दु:ख झाले. एका बहिणीचे लग्न तोंडावर आले होते, यापुढे काय होणार याची काळजी सर्वांना वाटू लागली. मात्र शेवटी औषधोपचार घेण्याचा मार्ग स्वीकारला. गेला महिनाभर मी उपचार घेत असून, आता हळूहळू बरे वाटू लागले आहे.एमडीचे व्यसन सोडल्यावर तुझे जीवन आता कसे आहे? आणि पुढे काय करायचे ठरविले आहेस ?एमडी सोडताना त्रास झालाच. पण आपल्यावरील जबाबदारीची जाणीव झाली. आई-वडिलांचे कष्ट दिसून आले. आता मी नियमित व्यायाम करू लागलो आहे. औषधांमुळे वजनही थोडे वाढले आहे. भूक व्यवस्थित लागते आणि थोडे शांत वाटू लागले आहे. आता नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे. लवकरच त्या दिशेने पावले टाकणार आहे. या वयात संगतीचा परिणाम आपल्यावर फार होत असतो. त्यामुळे कोणत्या मुलांबरोबर तुम्ही राहता हे महत्त्वाचे आहे. तरुण किंवा सर्वच वयोगटांतील मुलामुलींनी आपले मित्र निवडताना विचार करायला हवा. मला ज्या परिस्थितीतून जावे लागले, त्यातून कोणालाही जावे लागू नये हीच इच्छा.