मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात आलेल्या नोटीसवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. त्यावर, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंनी चौकशीला सामोरे जावे, असे म्हटले आहे. दोषी नसाल तर घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे जावा, असा मैत्रीपूर्ण सल्ला तावडे यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली आहे. कोहिनूर मिलव्यवहारप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून येत्या 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर, मनसैनिकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. तर, विरोधी पक्षही राज ठाकरेंच्या बाजुने उभा राहिला आहे.
शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे. विरोधक आणि मनसैनिकांच्या प्रतिक्रियेनंतर सत्ताधारी विनोद तावडेंनी राज यांना सल्ला दिला आहे. तसेच, ईडीच्या नोटीसचा आणि सरकारचा संबंध नसल्याचेही ते म्हणाले. तसेच, ईडी भाजपाच्या म्हणण्याप्रमाणे काम करतं, हा विरोधी पक्षांचा टिपिकल आरोप आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यावर ईडीची कारवाई झाली तर ते सत्ताधारी पक्षाला दोषी ठरवतात, आत्तापर्यंत असंच होत आलं आहे, असेही तावडे यांनी म्हटलं आहे.