युआयडी स्टिकर चिटकवू नका; मुंबईतील ४ हजार ‘रनर’ शिक्षकांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 09:49 AM2023-03-04T09:49:43+5:302023-03-04T09:50:49+5:30
पेपर शाळांमध्ये पोहोचविण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा आहे. यात प्रत्येक विभागातील एक प्रमुख शाळा ही प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी केंद्र म्हणून नेमली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याचे काम देण्यात येऊ नये असे लेखी आदेश आज एसएससी बोर्डाने सर्व मुख्य परीक्षा केंद्रांना दिले आहेत. याबाबत मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागीय मंडळाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत शुक्रवारी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने शिक्षकांना या कामातून वगळण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मुंबई ठाणे व पालघर तसेच नवी मुंबईतील रनरचे काम करणाऱ्या जवळपास ४ हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
पेपर शाळांमध्ये पोहोचविण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा आहे. यात प्रत्येक विभागातील एक प्रमुख शाळा ही प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी केंद्र म्हणून नेमली जाते. येथून सर्व प्रश्नपत्रिका ‘रनर’च्या माध्यमातून संबंधित विभागांतील शाळांमध्ये पोहोचवल्या जातात हे रनर शिक्षक असतात. राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून ही परीक्षा सुरळीत चालण्यासाठी मागील काही वर्षांपासून शिक्षकांना रनर म्हणून नियुक्त केले जाते. विविध कामांसोबतच या शिक्षकांना केंद्रावर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर युआयडी स्टिकर चिटकविण्याचे काम देत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी बोरनारे यांच्याकडे केल्या होत्या.