लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची ६ हजार कोटींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र ऑक्टोबरपर्यंत तरी ही कामे सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे कामे सुरू होण्याआधीच कंत्राटदारांना १० टक्के आगाऊ रक्कम देऊ नका. आठ महिने आधी ही रक्कम दिल्यास महापालिकांना ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या ३० कोटी रुपयांच्या व्याजाला मुकावे लागेल, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना लिहिले आहे.
मुंबईतील रस्त्यांच्या कंत्राटासंदर्भात ठाकरे यांनी याआधीही पत्र लिहून कंत्राटात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. रविवारी पुन्हा एक पत्र लिहून कंत्राटासाठी दिल्या जाणाऱ्या आगाऊ रकमेवर बोट ठेवले आहे. मुंबईतील रस्त्याचे कंत्राट हे कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी आणि मुंबईकरांना लुटण्यासाठी असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे.