नेतेगिरी मिरवू नका पक्षाला काय दिले ते सांगा - जे. पी. नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 02:47 AM2019-07-21T02:47:55+5:302019-07-21T06:17:24+5:30
आपल्याला पक्षामार्फत सत्ता कारणामध्ये कुठली पदे मिळतील याचा विचार करण्यापेक्षा पक्षात नेता म्हणून आपले स्थान कसे वाढेल याचा विचार करा
मुंबई : मी पंचवीस वर्षे पक्षाचे काम करतो, तीस वर्षे पक्षाचे काम करतो असे स्वत:ला मिरवण्यापेक्षा एवढ्या वर्षात तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि ह्यरिझल्ट ओरिएन्टेडह्ण काम करा अशा कानपिचक्या भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत येथे दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे,माजी पक्षाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नड्डा म्हणाले की आपल्याला पक्षामार्फत सत्ता कारणामध्ये कुठली पदे मिळतील याचा विचार करण्यापेक्षा पक्षात नेता म्हणून आपले स्थान कसे वाढेल याचा विचार करा. सत्तेचे पद आज आहे उद्या नाही. पण,नेतेपण आयुष्यभर टिकते. ते कसे टिकवायचे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही पक्षासाठी जे करताय त्याबाबत समाधानी आहात का याचे खरेखुरे प्रमाणपत्र स्वत:च स्वत:ला द्या, दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची वाट बघू नका, असेही ते म्हणाले.
पक्ष संघटनेत काम करणारा पेजप्रमुख इतरांइतकाच महत्त्वाचा आहे. निवडणुकीपुरता आपला वापर करून घेतात आणि नंतर आपल्याकडे लक्ष देत नाहीत अशी त्याची भावना बनता कामा नये. पक्षाचा महत्त्वाचा घटक म्हणून त्याला त्याचा आदर करा, असे नड्डा यांनी बजावले.
भाजपची सदस्यता मोहीम सध्या सुरू आहे. त्यासंदर्भात नड्डा म्हणाले की केवळ सदस्यसंख्या वाढवून पक्ष फुगवण्याचा या मोहिमेचा उद्देश नाही. ज्या विचाराने पक्ष उभा राहिला आहे, तो विचारही भाजपमध्ये येणाºया नवीन सदस्यांमध्ये रुजवा. त्यासाठी आधी स्वत: पक्षाची उच्च परंपरा, तत्त्वे यांचा अभ्यास करा. पक्ष वाढवायचा म्हणजे फक्त सूज येता कामा नये. गुणात्मकदृष्टयाही तो वाढला पाहिजे. देशासाठी भाजपला काय करायचे आहे हे आपल्याला इतरांना सांगता आले पाहिजे असेही ते म्हणाले.
जावडेकर मातोश्रीवर
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले.