लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या उतरणीला लागल्याने निर्बंध शिथिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, राज्यातील ११ जिल्ह्यांतील साथ नियंत्रणात आलेली नाही. येथील रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने या ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम ठेवावेत. तसेच, अन्यत्र काही मर्यादेत शिथिलता देण्याबाबतची शिफारस राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर हे चार जिल्हे तर मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर अशा ११ जिल्ह्यांतील रुग्णसंख्या अद्याप कमी होत नाही. इथे रुग्णसंख्या वाढत असून साथ नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवावेत. उर्वरित महाराष्ट्रात मात्र काही मर्यादेत निर्बंधांमध्ये शिथिलता आणावी. यात, दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवणे, लग्न सभारंभासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २५ जणांच्या उपस्थितीची मर्यादा वाढवावी; याशिवाय काही मर्यादांसह सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबतची शिफारस विभागाने केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टास्क फोर्ससोबत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भातील अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.
अजून दहा दिवस लोकल नकोच
मुंबईतील कोरोना स्थिती आणि लोकांच्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, मुंबईतील लोकल सेवा आणखी दहा दिवस सुरू करू नये, अशी शिफारस टास्क फोर्सने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.