‘साठी’त सेवानिवृत्त नकोच, आज मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:36 AM2018-03-14T06:36:58+5:302018-03-14T06:36:58+5:30
अंगणवाडी कर्मचा-यांचे सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे करण्यास महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने विरोध दर्शवला आहे.
मुंबई : अंगणवाडी कर्मचा-यांचे सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे करण्यास महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने विरोध दर्शवला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय घेताना शासनाने सेवासमाप्तीचे वय कमी करत ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचे’ काम केल्याची टीका कृती समितीने केली आहे. शिवाय शासनाविरोधात त्यांनी नुकतीच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या व अन्य मागण्यांसाठी बुधवारी, १४ मार्चला मंत्रालयात बैठकीचे आयोजनही केले आहे.
कृती समितीचे नेते एम.ए. पाटील म्हणाले, केंद्राच्या धोरणानुसार कर्मचाºयांचे सेवासमाप्तीचे वय ६५ वर्षे असूनही शासनाने मानधनवाढी आदेशात वय ६० वर्षे करण्याचा विषय अनाठायी घुसवला. एकात्मिक बाल विकास योजनेतील मंजूर पदांपैकी सध्या प्रकल्प अधिकाºयांची ३५२, मुख्य सेविकांची ७१७, अंगणवाडी सेविकांची १ हजार ६२०, मदतनिसांची ५ हजार १७२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रोजच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. अशात सेवासमाप्तीचे वय कमी केल्यास आणखी १३ हजार पदे रिक्त होतील. त्यामुळे लाभार्थी आहार, पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण या सेवांपासून वंचित राहण्याची भीती कृती समितीने व्यक्त केली आहे.
>निर्णय होणार का?
अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि शासनामध्ये सेवासमाप्तीचे वय आणि कर्मचाºयांच्या इतर मागण्यांसाठी मंत्रालयात बुधवारी, १४ मार्चला बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत तरी सकारात्मक तोडगा निघेल, या आशेने लाखो अंगणवाडी कर्मचाºयांचे लक्ष या बैठकीकडे लागून आहे.